कालच शरद पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांच्या झालेल्या ‘गेटटुगेदर’ला हजेरी लावली होती. याठिकाणी अजित पवारही उपस्थित होते. या कौटुंबिक सोहळ्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची चर्चा आहे. या सगळ्या घटनाक्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काका-पुतण्याच्या भेटीमुळे यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडणार का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तर दुसरीकडे दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह मिळविण्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू आहे. कालच्या सुनावणीसाठी स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजितदादांच्या गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांबद्दल आक्षेप घेतला. आम्ही यापैकी २० हजार शपथपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये ८ हजारापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. यावर आता अजित पवार गट कशाप्रकारे बाजू मांडणार, हे पाहावे लागेल.