• Mon. Nov 25th, 2024
    वाह! यंदाच्या दिवाळीत म्हाडालाच लागली लॉटरी, ५०० कोटींचा निधी कसा आला परत? वाचा सविस्तर…

    मुंबई : मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी म्हाडा प्राधिकरणाचा निधी वळता करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला. त्यानुसार धारावी पुनर्वसन प्रकल्पास रेल्वे भूसंपादनासाठी म्हाडाच्या खजिन्यातील ५०० कोटी रुपयांचा निधी वळविण्यात आला होता. यापैकी २०० कोटी रुपये म्हाडाच्या स्वनिधीतून देण्यात आले, तर महाराष्ट्र निवारा निधीतून म्हाडाला ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र, धारावी पुनर्वसन प्रकल्पातर्फे हा संपूर्ण ५०० कोटी रुपयांचा निधी ऐन दिवाळीत म्हाडास परत मिळाला आहे. हा निधी परत आल्याने म्हाडाच्या अखत्यारीतील प्रकल्पांना यामुळे गती मिळणार आहे.

    राज्य सरकारच्या आदेशानुसार, धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर १ ते ५चा विशेष हेतू कंपनीतर्फे (स्पेशल पर्पज व्हेईकल) एकत्रित विकास साधण्यासाठी ५ नोव्हेंबर २०१८मध्ये शासन निर्णयामार्फत मंजुरी दिली. त्यात, रेल्वेच्या मालकीच्या अंदाजे ४६ एकर जमिनीचा ताबा मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधण्यात आला. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी बैठकीत रेल्वेची जमीन घेण्यासाठी आवश्यक ८०० कोटी रुपये आगाऊ भरणा करण्यासाठी म्हाडाने २०० कोटी रुपये, महाराष्ट्र निवारा निधीतून ३०० कोटी रुपये, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ३०० कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    यानुसार, म्हाडाने धारावी पुनर्वसन प्रकल्पास ५०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. ही रक्कम म्हाडाकडे परत आल्याने म्हाडाच्या स्वनिधीतून सुरू असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासह पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पासारख्या प्रकल्पांना सहाय्य मिळेल, असा दावा केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed