• Sat. Sep 21st, 2024

शिष्यवृत्ती अडल्याने परदेशातील विद्यार्थी संकटात; OBC विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्च भागवणेही अवघड

शिष्यवृत्ती अडल्याने परदेशातील विद्यार्थी संकटात; OBC विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्च भागवणेही अवघड

मुंबई : राज्य सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या भरवशावर शिक्षणासाठी परदेशी दाखल झालेले व तेथील विद्यापीठांमध्ये शिक्षणही सुरू केलेले ५० इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने अद्याप या विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसेच जमा न केल्याने परदेशी राहणे जिकिरीचे झाले असून, जेवण, निवासाचा खर्च भागवणे अवघड होऊन बसले आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या ओबीसी समाजातील ५० विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारने ३० ऑगस्ट रोजी या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. यातील काही विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झाल्याने ते परदेशातील विद्यापीठांमध्ये दाखल झाले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आगामी एक महिन्याच्या खर्चाचे नियोजन केले आहे. मात्र आता त्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे.

‘परदेशात जाण्यासाठी विमानाच्या तिकिटाची रक्कम, तेथील वसतिगृहाचे भाडे, कॉलेजचे शुल्क, विम्याचे शुल्क, तसेच दैनंदिन गरजांसाठीची रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले. कॉलेज सुरू होणार असल्याने बहुजन कल्याण विभागाकडे विचारणा केली असता, काही दिवसांत पैसे खात्यावर जमा होणार असल्याने तूर्तास स्वतःच्या खर्चाने तिथे जा, असे सांगण्यात आले. काही दिवसांत पैसे मिळतील, या आशेवर घरून थोडे पैसे घेऊन युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षणासाठी आले आहे. आता घरून आणलेले पैसे संपले आहेत. वसतिगृहाचे भाडे जमा करण्यासाठी मालकाने तगादा लावला आहे’, अशी व्यथा एका विद्यार्थिनीने ‘मटा’समोर मांडली. ‘सरकारच्या भरवशावर दूरदेशी आले. मी जमा करून आणलेले पैसे संपत आले आहेत. अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता प्रक्रिया सुरू असल्याचेच उत्तर मिळते’, असेही विद्यार्थिनीने नमूद केले.

अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची हीच अवस्था झाली आहे. ‘पुढील आठवड्यात कॉलेजचे वर्ग सुरू होतील. शुल्क भरल्याशिवाय वर्गात बसता येणार नाही, असे विद्यापीठाने कळवले आहे. सध्या खाण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे एकवेळ जेवून गुजराण करीत आहे’, असे अन्य एका विद्यार्थ्याने सांगितले.

सदावर्तेंची याचिका म्हणजे मराठा समाजाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न | विनोद पाटील

सरकारी विभागांची टोलवाटोलवी

पुणे विभागातून १८ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून, ११ विद्यार्थी परदेशात गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शुल्काची आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाली असून, त्यांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. सरकारकडून निधी मिळाला, की विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे बहुजन कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, संचालक कार्यालयाकडून अद्याप प्रस्ताव मिळाला नाही. संचालक कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला, की विद्यार्थ्यांचे पैसे वितरीत केले जातील, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

परदेशी गेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना गेल्या महिनाभरात एकाही रुपयाची सरकारी मदत मिळालेली नाही. हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत असून, परमुलखात कोणाकडे मदत मागायची? राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्तीची रक्कम अदा करावी… – ॲड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed