चालू वर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही तसेच मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही.. विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे.. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्यांनी मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी म्हंटलंय.
दरम्यान नगर- नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी मराठवाड्यातील नेते एकत्रित येतात मात्र नगर-नाशिकचे नेते एकत्र येताना दिसत नाही अशी खंतही गडाख यांनी व्यक्त केली.. नाशिकचे नेते एकत्रित येतील की नाही माहिती नाही पण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र यायला हवं आणि समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
नाशिकमध्येही विरोध
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि इतर धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध होताच धरण परिसरात आणि वहन मार्गात जिल्हा प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडलं जाणार असल्यानं नाशिक महापालिकेला पाणी कपात देखील करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध दर्शवला होता. आता नाशिकमधील पाणी सोडण्यास विरोधाचं लोण अहमदनगरमध्ये देखील पोहोचलं आहे.
दरम्यान, मान्सूनचा पाऊस योग्य प्रकारे न झाल्यानं राज्यात पाणी प्रश्नाची समस्या निर्माण झाली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News