यावेळी मनोज जरांगे पाटील यांना नारायण राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, राज्यातील सरकार १०० टक्के मराठा समाजाविरोधात उठले आहे. २०२४ पर्यंत आम्ही शांत राहणार आहोत. सरकार कोणाला पुढं घालतंय ते पाहू. २०२४ मध्ये मराठा समाज काय असतो, हे आम्ही दाखवून देऊ. सामान्य मराठ्यांमध्ये फूट पाडणे सोपे नाही. सामान्य शेतकऱ्यांना सरकारने डिवचू नये, शांत राहावं, घेतलेल्या वेळेत आरक्षण द्यावे. सरकारने आता आमचा अंत बघू नये. आतापर्यंतच्या लढ्यात बळी गेलेल्या मराठा बांधवांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने मराठ्यांचे बळी घेऊ नयेत. ही गोष्ट सरकारला महागात पडेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. जुन्नर, बारामती, फलटण, दहिवाडी परिसरात त्यांच्या सभा होणार आहेत. आज राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा समाजाला येत्या २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होईल. पण हे शांततेचं युद्धही सरकारला पेलवणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
कुणबी आरक्षण घेण्यात कमीपणा नाही: मनोज जरांगे पाटील
राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव आरक्षण मागत आहेत. कुणबी नावाने आरक्षण घेण्यात काहीही वाईट नाही. कुणबी म्हणजे शेती करणारा. आमचा बापजादा शेती करायचा, श्रीमंत मराठाही शेती करायचा. त्याला फक्त कुणबी हे नाव होतं. मराठा समाजाला क्षत्रिय आणि कुणबी अशी दोन अंग आहेत. त्यामुळे कुणबी या शब्दाशी नातं तोडता येणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.