‘मॅडम कमिशनर’मधून सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या चर्चेमुळे अनेक वाचकांनी विविध दुकानांमध्ये या पुस्तकाची विचारणा सुरू केली. तर काही वाचकांनी हे पुस्तक ऑनलाइन मागवण्याचेही पर्याय पडताळून पाहिले. ऑनलाइन उपलब्ध नसल्याने काहींनी किंडल, अॅपल, गुगल यावर सर्च केले आहे.
‘मॅडम कमिशनर’वरून रविवारी चर्चा सुरू झाल्यानंतर ‘किताबखाना’ या लोकप्रिय दुकानात ताबडतोब त्याविषयी विचारणा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. हे पुस्तक गेल्या आठवड्यापासून उपलब्ध झाले होते. मात्र रविवारनंतर याची मागणी अधिक वाढल्याचे निरीक्षण किताबखानाकडून नोंदवण्यात आले.
यापूर्वी बोरवणकरांच्या प्रकाशित झालेल्या ‘माझ्या आयुष्याची पाने’ या पुस्तकाची मागणी होती, अशी माहिती मॅजेस्टिकचे आशय कोठावळे यांनी दिली. नवे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर याही पुस्तकाची विचारणा होऊ लागली आहे, असे ते म्हणाले.
पुण्यातील पुस्तकविक्रेते ‘अक्षरधारा’चे रमेश राठीवडेकर यांनीही मराठी पुस्तकाची मागणी पुन्हा वाढली असल्याच्या निरीक्षणाला दुजोरा दिला. बाजारात पुस्तक आले की, विचारणा करणाऱ्या वाचकांव्यतिरिक्त नवे वाचक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर काही वाचकांनी हा पब्लिसिटी स्टंट असून वाचक म्हणून सध्या तरी या पुस्तकापासून दूर राहणार, असे मत नोंदवले.
Read Latest Maharashtra News And Marathi News