• Sat. Sep 21st, 2024

मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’

मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही अन् कानात कुजबूज करू दिली नाही. समाजाशी गद्दारी न केल्यामुळे लाखो लोकांचे पाठबळ मिळत आहे. आंदोलनाचा रथ पुढे गेला असून, मराठा आरक्षणाशिवाय माघार नाही,’ असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी आंदोलनाबाबत मनमोकळा संवाद साधला. जरांगे यांच्या विराट सभेच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यास होकार दिला आहे. राज्य सरकारने उशिराने हालचाली सुरू केल्या का, असे विचारता जरांगे यांनी ‘पुढील आठ दिवसांत आरक्षणाचा पेच सोडविणार की ठेवणार हा प्रश्न सरकारचा आहे. व्यवसायाधारित जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असल्यामुळे कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी आमची मागणी आहे. सन १९२३पासून आम्ही आरक्षणासाठी पात्र आहोत. हक्काचे आणि ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. कारण ५० टक्क्यांवरील आरक्षण टिकत नाही, हे पक्के माहीत आहे. दोन आयोगांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिले. त्या दोन्ही वेळी दगाफटका झाला. हक्काचे आरक्षण असताना आम्हाला ५० टक्क्यांपलीकडील आरक्षण का देता,’ असा सवाल केला. यावेळी प्रदीप सोळुंके, प्रा. संतोष तांबे, विजय काकडे, नितीन देशमुख, सुनील कोटकर आदी उपस्थित होते.

Maratha Reservation: ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील: विजय वडेट्टीवार

मनोज जरांगे यांनी मांडलेले मुद्दे

* क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाल्यामुळे आमचे लक्ष तिकडे राहील. मग, राज्या समिती का नेमली, हे सरकार स्पष्ट करावे. आम्हाला २४ ऑक्टोबरच्या आत आरक्षण पाहिजे.

* सध्या आठ दिवस वेळ असल्यामुळे १८ ऑक्टोबरपासून राज्यात दुसऱ्या टप्प्यातील दौरा काढणार आहे. १८ आणि १९ ऑक्टोबरला मुंबईत, त्यानंतर पुणे, बारामती, मावळ, फलटण भागांत दौरे होतील.

* मराठ्यांना हक्काचे आरक्षण देण्यात नेमकी अडचण काय असे अनेक मंत्र्यांना विचारले; विचारून सांगतो असे म्हणतात आणि ते माघारी येतच नाहीत.

प्रस्थापित मराठे ७० वर्षे काय करत होते ? देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाच्या हत्याराचा वापर: सदाभाऊ खोत

आम्ही आरक्षणाचे निकष पूर्ण केले आहेत. व्यवसायानुसार शेती आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारला आरक्षण द्यावेच लागेल.

– मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

जरांगे पाटील लवकरच मुंबईत

मराठा आरक्षणाप्रश्नी उभ्या राज्याचे लक्ष वेधून घेणारे मनोज जरांगे पाटील हे लवकरच मुंबईत येणार आहेत. येत्या १८ किंवा १९ ऑक्टोबरला ते शिवाजी मंदिर येथून मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून आरक्षण देण्यात यावे, ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. जालना येथे शनिवारी त्यांनी मराठा समाजाची अतिविशाल सभा आयोजित केली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सभेत जरांगे पाटील यांनी सरकारला आता फक्त १० दिवसांची मुदत उरली असल्याचा इशारा दिला होता. आता सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागून राहिलेले असतानाच ते लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मुंबई भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या | बाळासाहेब सानप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed