• Mon. Sep 23rd, 2024

दादांना खंबीर साथ, राजकारणात पाय रोवायला सुरूवात, पार्थ सहकारातून पुन्हा ‘धडक’ मारणार?

दादांना खंबीर साथ, राजकारणात पाय रोवायला सुरूवात, पार्थ सहकारातून पुन्हा ‘धडक’ मारणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रासह देशात आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने आता बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची सहकार क्षेत्राद्वारे राजकारणात ‘एंट्री’ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांकडून त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील पक्षवाढीचे ओझे अजित पवार यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या बैठकांना फारसा वेळ देता येत नसल्याचे कारण सांगून अजित पवार यांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. बँकेने तो मंजूरही केला. त्यामुळे आता अजितदादांच्या जागी कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.

काय चिंता करायची गरज नाही, सत्ता आपलीच येणार ; जयंत पाटलांचं पवारांसमोरच भाकित

बारामती तालुक्यातील अ वर्गातून संचालक निवडून गेलेल्या अजितदादांच्या जागी आता पार्थ पवार यांची वर्णी लावावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजितदादांकडे शिफारस करणार असल्याचे बोलले जात आहे. एका जागेसाठी बँकेची निवडणूक होणार नाही. सहकार कायद्यान्वये बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतच नव्या संचालकांची नियुक्ती करता येते, अशी तरतूद आहे. त्यामुळे या जागी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळच्या लोकसभेच्या निवडणुकीत नशीब अजमाविण्याचा पार्थ यांनी प्रयत्न केला. मात्र, तळागळापर्यंत पार्थ यांचा संपर्क नसल्याने आणि राजकीय कुरघोडीमुळे पार्थ यांना पहिल्या प्रयत्नात यश येऊ शकले नाही. त्यानंतर पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी महापालिकेच्या पोट निवडणुकीच्या माध्यमातून ते सक्रीय झाले होते.

३२ वर्षांच्या इनिंगला अजितदादांकडून पूर्णविराम, सहकारातील देशातील आघाडीच्या बँकेतून राजीनामा
पार्थ यांची संचालकपदी नियुक्ती होणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात अजितदादांची दोन्ही मुले पार्थ आणि जय हे व्यासपीठावर दादांच्या मागे उभी असल्याचे दिसून आली. त्याशिवाय पुण्यात अजितदादांची रॅली काढून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी पार्थ सोबत होते. त्यामुळे पार्थ हे पक्षाच्या कामात दादांची मदत करीत असल्याचे समर्थक सांगतात.

अजितदादा पुण्याचे कारभारी झाल्याने विकासाला गती मिळणार, ‘डीपीसी’च्या निधी वाटपाचा तिढा सुटणार?

जिल्हा बँकेचे संचालकपद रिक्त असताना त्या जागेवर कोणाची वर्णी लावावी याचा निर्णयही दादाच घेणार असल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेसह पार्थ यांची संचालकपदी नियुक्ती होणार का, त्याद्वारे राजकारणात एंट्री होणार का यासारख्या मुद्यांमुळे अजितदादांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed