मुंबई : सध्या दरमहा २५ कोटी रुपयांनी तोट्यात असलेल्या मोनोरेलला गणेशोत्सवात काळात तरी उभारी मिळावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या परिसरातून धावणाऱ्या मोनोरेलने प्रवास करा व गणरायाचे दर्शन घ्या, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
देशातील पहिली मोनोरेल मुंबईत २०१४मध्ये सुरू झाली. चेंबूर ते वडाळा व वडाळा ते जेकब सर्कल, अशी दोन टप्प्यांत सुरू झालेली ही मार्गिका सुरुवातीपासून तोट्यात आहे. मात्र या मार्गिकेवरील बहुतांश स्थानके ही मुंबईच्या प्रसिद्ध अशा गणेश मंडळांच्या भोवती आहेत. त्यामुळेच आता यंदाच्या गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह असताना एमएमआरडीएने त्यानिमित्ताने मोनोरेलचे प्रवासी वाढावे, यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ने सर्वांना गणेशोत्सवाच्या समाजमाध्यमांवर शुभेच्छा देत आवाहन केले आहे. ‘मोनोरेल ही असंख्य सण व या सणांशी जोडलेल्या भावनांची साक्षीदार होत आपल्या परिने या सण व उत्सवात भाग घेते’, असे ‘एक्स’वर ‘एमएमआरडीए’ने म्हटले आहे.
सर्व प्रसिद्ध गणेश मंडळे याच मार्गिकेवर
सर्व प्रसिद्ध गणेश मंडळे याच मार्गिकेवर
-मोनोरेलची मार्गिका जिथून सुरू होते तो चेंबूरचा परिसर टिळकनगरच्या प्रसिद्ध गणपतीपासून जवळ आहे. त्यानंतर ही मार्गिका अँटॉप हिलच्या पुढे आचार्य अत्रेनगर स्थानकावर पोहोचते. तिथून किंग्स सर्कलचा जीएसबी गणपती थोड्या अंतरावर आहे.
-दादर पूर्व स्थानक हे तांत्रिकदृष्ट्या वडाळ्यात आहे. वडाळ्यातील अनेक मोठे व जुने सार्वजनिक गणपती याच भागात आहेत. तिथून ही मार्गिका पुढे नायगावला व त्यानंतर लोअर परळ, चिंचपोकळीमार्गे जेकब सर्कलला पोहोचते.
-नायगाव-लोअर परळ व चिंचपोकळी या संपूर्ण भाग लालबागच्या राजापासून ते गणेशगल्ली, तेजुकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी या सर्व प्रसिद्ध व लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सवापासून पायी अंतरावर आहेत.
-परळ येथील मिंट कॉलनी स्थानकाशेजारी इच्छापूर्ती गणपती मंदिर असून तेथील गणेशोत्सवही प्रसिद्ध आहे.