भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १० हजार ३५ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून, गडचिरोली- आरमोरी मार्ग बंद आहे. शिवाय शिवणी आणि गोविंदपूर नाल्यांनाही पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीच्या पुरामुळे आष्टी-गोंडपिपरी तसेच अहेरी-मोयाबीनपेठा, देसाईगंज वळण मार्ग, भेंडाळा-गणपूर बोरी, शंकरपूर हेटीमार्कंडादेव हरणघाट हे मार्गही बंद आहेत.
दरम्यान, प्रशासनाने देसाईगंज आणि गडचिरोली तालुक्यातील १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील ५३, देसाईगंज शहरातील हनुमान वॉर्डातील ६७ आणि गडचिरोली तालुक्यातील कोटगल, पारडी आणि शिवणी येथील ७९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.