आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय बाजारपेठेलाही बसू लागला आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत असला, तरी व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावर कायमस्वरूपी आणि स्वस्त पर्याय शोधण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने महत्वाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील एका संस्थेच्या मदतीने त्यांनी थेट इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे यशस्वी संशोधन केले आहे.त्यामुळे व्यवसायिक गॅस तुटवड्याच्या या काळात इथेनॉल स्टोव्ह संजीवनी ठरू शकतो. देशाच्या पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ देत कोपरगावच्या कोल्हे कारखान्याने यापूर्वीच सीएनजी प्रकल्पाद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे. आता संजीवनी समूहाच्या सोबतीने इथेनॉलला इंधनाचा मुख्य स्रोत बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून, त्याचा वापर घरगुती किंवा व्यावसायिक शेगड्यांसाठी केल्यास गॅसवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. विशेष म्हणजे, हा पर्याय व्यावसायिक गॅसच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर ठरणार आहे.