• Wed. Mar 18th, 2026
    Devendra Fadnavis: पाच वर्षांत वीजदर कमी; दरवर्षी 1.2 टक्के घटवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

    Devendra Fadnavis: सौरऊर्जेचा लाभ कमी झाल्याने वीजदेयकात वाढ होत असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.

    वीजदरात दरवर्षी १.२ टक्के घट- मुख्यमंत्री(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : महावितरणने केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षे वीजदर वाढण्याऐवजी दरवर्षी १.२ टक्क्यांनी कमी होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. सौरऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील उद्योगांना, ‘सोलर अवर्स’मध्ये (सकाळी ९ ते सायंकाळी ५) वीज वापरल्यास २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    ‘पूर्वी रात्री १२ ते ६ या वेळेत वीज वापरासाठी सवलत दिली जात होती. कारण तेव्हा वीज शिल्लक असायची. मात्र, आता सौरऊर्जेमुळे दिवसा (सकाळी ९ ते सायंकाळी ५) विजेची उपलब्धता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरण बदलून दिवसा वीज वापरणाऱ्यांना २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा उद्योगांना होणार आहे.

    शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, नितेश राणे भयंकर संतापले, जितेंद्र आव्हाडांकडून दिलगिरी

    महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमइआरसी) वीज खरेदीच्या अंदाजात आणि भांडवली खर्चात काही तांत्रिक चुका केल्या होत्या. यामुळे महावितरणचे सुमारे ८०,००० कोटी रुपयांचे ऊर्जा शुल्क आणि ५५,००० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा खर्च नाकारला गेला असता. राज्य शासनाने या चुका आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान टळले आणि ग्राहकांवरील संभाव्य दरवाढीचा भार कमी झाला’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महावितरण कंपनीने एक लाख कोटी रुपयांचा वार्षिक महसूलाचा टप्पा पार करून देशातील सर्वांत मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.Maharashtra TimesDevendra Fadnavis : स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर काय करावं? देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सर्व स्टेप्स सांगितल्या
    औद्योगिक वीजमागणीत २३ टक्के वाढ
    कॅप्टिव्ह सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्यांनी जर ‘बॅटरी स्टोरेज सिस्टिम’चा वापर केला, तर त्यांना २४ तास सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होऊ शकते. बॅटरी स्टोरेजचे दर आता २.८० ते २.९० रुपयांपर्यंत खाली आले असून, उद्योगांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ‘मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना’ आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत औद्योगिक विजेची मागणी २३ टक्क्यांनी वाढली आहे, जे राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे निदर्शक आहे’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा