ऐतिहासिक चवदार तळ्याच्या ५५.८० कोटींच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर चवदार तळ्याचे रूप पालटणार असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तटकरेंना निमंत्रित केले आहे.
महाड येथील चवदार तळे हे सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते. येथेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांनाही सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळावा, यासाठी आवाज उठवला होता. या सत्याग्रहामुळे देशातील सामाजिक क्रांतीला नवी दिशा मिळाली होती. येत्या २० मार्चपासून या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असल्याने यंदाचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
चवदार तळे परिसराचा विकास, जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनाने सुमारे ५५.८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये तळ्याचे जलशुद्धीकरण, परिसराचे सुशोभीकरण, पर्यटन सुविधा तसेच ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. या विकास आराखड्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे.
Tadoba Pillars History : ‘ताडोबातील खांब इंग्रजकालीन नाहीत’; शिवकालीन असल्याचा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा
राज्य सरकार तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अनुयायांची इच्छा होती की, या ऐतिहासिक विकासकामांचे भूमिपूजन सुनील तटकरे यांच्या हस्ते व्हावे. त्यानुसार आता त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी हा सन्मान नम्रपणे स्वीकारला आहे.
चवदार तळे हे केवळ ऐतिहासिक ठिकाण नसून सामाजिक समतेच्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारे हे विकासकाम महाडच्या इतिहासात नवा अध्याय ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच या प्रकल्पामुळे महाडच्या ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळण्यासह पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
