ऑनलाइन कुर्ती खरेदी करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. रिफंडच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ९८ हजार रुपये लंपास केले. या धक्कादायक घटनेनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने ‘वेस्टसाईड’च्या (Westside) अधिकृत वेबसाइटवरून चार कुर्तींची ऑर्डर दिली होती. ऑर्डर देतानाच त्यांनी ऑनलाइन पेमेंटही केलं होतं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं. मात्र, काही वेळातच त्यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण कस्टमर केअरमधून बोलत असल्याचं भासवलं. “मॅडम, तुमचं पेमेंट तांत्रिक अडचणीमुळे फेल झालं आहे,” असं सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढलं.
रिफंडच्या नावाखाली गंडा
भामट्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि आधीचे पैसे परत मिळवण्यासाठी (Refund) एक प्रोसेस करायला सांगितली. या प्रक्रियेचा भाग म्हणून महिलेला सुरुवातीला २,६४७ रुपये भरण्यास सांगण्यात आले. एकदा का मासा गळाला लागला की सायबर चोरटे सोडत नाहीत, तसंच काहीसं इथे घडलं. रिफंड मिळवण्याच्या नादात महिलेने समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या. इकडे महिलेला वाटत होतं की पैसे परत येतील, पण तिकडे खात्यातून पैसे उडू लागले होते.
Nashik Crime : डॉ. नीलेश घरी असताना मनीषा जेजुरकरांनी जीव दिला कसा? कुटुंबाला संशय, घटनास्थळी दोन सिरींजमुळे गोंधळ
काही मिनिटांतच एकामागून एक अनेक ट्रान्झॅक्शन झाले आणि महिलेच्या खात्यातून तब्बल ९८ हजार रुपये लंपास झाले. मोबाइलवर मेसेज पडू लागल्यावर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, याबद्दलचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
पोलिसांचं आवाहन
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. “कोणतीही अधिकृत कंपनी रिफंड देण्यासाठी ग्राहकांकडून उलट पैसे मागत नाही किंवा ओटीपी (OTP), बँक डिटेल्स विचारत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करणं टाळा,” असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
त्यामुळे, ऑनलाइन शॉपिंग करताना जर तुम्हालाही असा संशयास्पद फोन आला, तर सावध व्हा, अन्यथा कष्टाची कमाई एका क्षणात गमावण्याची वेळ येऊ शकते.
