• Wed. Mar 18th, 2026
    Mira Bhayander Hospital : ICU मध्ये उंदराने हात कुरतडला, मीरा भाईंदरमध्ये महिलेचा करुण अंत; सरकारी हॉस्पिटलमधील प्रकाराने संताप

    Pandit Bhimsen Joshi Government Hospital News : दुर्दैवाने उपचारादरम्यान काल संध्याकाळी सुहासिनी माटेकर यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

    उंदराने चावलं महिलेचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    भाविक पाटील, मीरा-भाईंदर : भाईंदर मध्ये अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार सोमवारी उघड झाला. शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या 89 वर्षीय वृद्ध महिलेचा हात चक्क उंदराने कुरतडल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जखमी महिलेचा काही तासांतच मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून घडलेल्या घटनेवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    खाटेवर सर्वत्र रक्ताचे लोट

    भाईंदर पश्चिमेच्या जोशी रुग्णालयात 12 मार्च रोजी श्वसनाचा अधिक त्रास जाणवू लागल्याने इतर आजारांनीही ग्रस्त असलेल्या भाईंदर पूर्वेच्या रहिवासी असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माठेकर यांना त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केले होते. तेव्हापासून शुद्धीवर नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर उपचार सुरू होते. काल सोमवारी पहाटे त्यांना पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आले असता, खाटेवर सर्वत्र रक्ताचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कुटुंबीयांनी कुठे इजा झाली आहे का ? हे पाहिले असता उंदराने त्यांचा उजव्या हाताचा कोपरा कुरतडला असल्याचे दिसून आले. सुरुवातीला रुग्णाला झोपून इजा झाल्याचा दावा उपस्थित रुग्णालय कर्मचार्‍यांकडून केला जात होता. मात्र, नंतर कुटुंबीयांनी उंदराचे पुरावे दिल्यानंतर त्यांनी ही बाब मान्य करून कुरतडलेल्या जखमेवर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रुग्ण महिलेचा अचानक मृत्यू झाला.
    Maharashtra TimesHarish Rana : सर्वांना क्षमा करुन निरोप घे; ध्यानात्मक जपाचा अर्थ ब्रह्मकुमारी सदस्यांनी सांगितला, इच्छामृत्यू प्रक्रियेला तीन आठवडे लागणार

    ‘आईच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार’

    या प्रकरणी शिवसेना उबाठासह मनसेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागातील डॉक्टर व परिचारीका अश्या दोघांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. यासह संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. उंदराच्या वावराबाबतची पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने ही घटना घडली असल्याचा दावा रुग्ण महिलेची मुलगी मीनल माठेकर देसाई यांनी केला आहे. ‘आईच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगत’, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा