वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून अनेक वर्षे झाली असली तरी त्यांच्यातील शिवसैनिक जागा असल्याची प्रचीती त्यांच्या भाषणाने दिली. ‘सध्या सर्वत्र जातींचा बोलबाला आहे. मात्र, जातपात न बघता राजकारण करणारा एकमेव पक्ष शिवसेना आहे. बाळासाहेबांसारखा नेता होणार नाही’, असे त्यांनी बोलून दाखविले.
राजकीय अंधश्रद्धा दूर करा : अंधारे
आपल्याकडे अनुयायी नव्हे तर भक्त वाढत आहेत. आज खऱ्या अर्थाने राजकीय अंधश्रद्धा दूर करण्याची गरज असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सभागृहात नाहीत. मात्र, मला त्यांच्यासमक्ष त्यांच्या पक्षातील अंधश्रद्धा मांडायच्या होत्या, असे त्या म्हणाल्या. प्रा. श्याम मानव यांनी अंधश्रद्धेमागील मानसिकता सोपी शब्दांत समजावून सांगितली. धर्म वा पूजापद्धती न नाकारता विज्ञानवादी दृष्टिकोन अंगिकारणाऱ्या संतशिकवणुकीचे दाखले त्यांनी दिले. अंधश्रद्धाविरोधी कायदा पारित होण्यासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांनी कशी भक्कम साथ दिली, हे त्यांनी समजावून सांगितले. बापू आणि बाबा यांच्या विचारांची जपणूक करीत जातपात सोडून सर्वांनी संविधान वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी कळकळीची हाक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी दिली. सी. मो. झाडे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे यांनी कार्यक्रमामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन पंकज वंजारे यांनी केले. आभार नाना समर्थ यांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी सभागृहात उपस्थित होते.
…-तर अटकच झाली नसती : अनिल देशमुख
‘राजकीय विरोधकांना हाताशी धरून माझ्यावर १०० कोटींचा आरोप करण्यात आला. अखेर न्यायालयानेच या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवले, त्या कारागृहात मला १४ महिने काढावे लागले. तेव्हा मी तडजोड केली असती, काही कागदपत्रांवर स्वाक्षरी केली असती तर माझ्यावर ही वेळच आली नसती’, असे अनिल देशमुख यांनी जाहीरपणे सांगितले. तपास एजन्सींनी चॉकलेट देऊन माझ्या सहा वर्षांच्या नातीकडूनही चौकशीचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगताच सभागृहातून ‘शेम शेम’च्या घोषणा निनादल्या.