• Wed. Mar 18th, 2026
    Nagpur Crime : चारित्र्याचा संशय, बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी पतीचा जीवघेणा हल्ला; नागपूरमधील घटना

    चारित्र्याच्या संशयातून एका पतीने बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या मोहन नगरमध्ये घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पती फरार आहे.

    नागपुरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : चारित्र्याच्या संशयातून पतीने स्वतःच्या बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या पत्नीवर चाकू आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातील मोहन नगर परिसरात उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळी शिवशंकर मंदिराजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी महिलेवर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    आदित्य रमेश उईके (वय २५, रा. पांढराबोडी, रामनगर) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने पत्नी गुनगुन हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. गुनगुन ही गरोदर असल्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी मोहन नगर येथील आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वीच तिचे बाळंतपण झाले होते. मात्र, त्यानंतरही ती सासरी परतली नाही. याच कारणावरून आदित्यच्या मनात संशय निर्माण झाला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी सासरी येत नसल्यामुळे आदित्य सतत तिच्या चारित्र्यावर शंका घेत होता. या संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर हा वाद मंगळवारी सकाळी हिंसक वळणावर गेला. आदित्य हा मोहन नगरमध्ये येऊन शिवशंकर मंदिराजवळ गुनगुनला भेटला. दोघांमध्ये पुन्हा याच मुद्द्यावरून वाद झाला आणि संतापाच्या भरात त्याने जवळील कोयता काढून पत्नीवर वार केले. या हल्ल्यात गुनगुनच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत ती रस्त्यावर कोसळली.

    Maharashtra TimesSolapur Crime : सोलापूरमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; प्रॉपर्टीसाठी पुतण्यांनी काका-काकीचा जीव घेतला, आरोपी अटकेत

    घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी आदित्य उईके विरुद्ध ‘खुनाचा प्रयत्न’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

    दरम्यान, केवळ चारित्र्याच्या संशयातून नवमातेला अशा पद्धतीने लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कौटुंबिक वादातून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा