युद्धाचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रापर्यंत पडताना दिसत आहेत. गॅसटंचाईमुळे पालीतील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भक्तांना दिला जाणारा महाप्रसाद आणि लाडू देखील बंद झाला आहे.
पाली हे अष्टविनायकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून अष्टविनायक यात्रा करणारे हजारो भाविक दरवर्षी येथे येत असतात. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून शेकडो भाविक पाली येथे येतात. साधारणपणे दिवसा आणि रात्री मिळून सुमारे 400 भाविक देवस्थानच्या अन्नछत्रात अत्यल्प दरात महाप्रसादाचा लाभ घेतात. एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ही संख्या दिवसाला 800 च्या वर जाते. मात्र सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे अन्नछत्र चालवणे अशक्य झाले आहे. यामुळे भाविकांना देवस्थानात मिळणाऱ्या सात्विक भोजनापासून वंचित राहावे लागत आहे.
भाविकांना प्रसाद घेण्यास अडचण
अन्नछत्र बंद झाल्याने अनेक भाविकांना मंदिराबाहेरील हॉटेल्समध्ये जेवण करावे लागत आहे. मात्र तिथे अन्नछत्राच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त पैसे मोजावे लागत असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे. केवळ भूक भागवणे हा उद्देश नसून देवस्थानचा सात्विक प्रसाद ग्रहण केल्याने मिळणाऱ्या मानसिक आणि आध्यात्मिक समाधानालाही भाविक मुकत असल्याचे अनेक भाविक सांगत आहेत. अन्नछत्रासोबतच देवस्थानचा प्रसिद्ध प्रसादाचा लाडूदेखील सध्या बंद करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लाडू तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा नसल्याने हे उत्पादनही थांबले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद घेण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
देवस्थानतर्फे अवघ्या 30 रुपयांत भाविकांना मुबलक आणि सात्विक भोजन दिले जाते. हा उपक्रम कोणत्याही व्यावसायिक उद्देशाने नसून सेवाभावी वृत्तीने चालवला जातो. मात्र कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्याने ही व्यवस्था सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे. लाकूड वापरून इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणे शक्य नसून त्यातून प्रदूषण होण्याची शक्यताही अधिक असल्याचे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
देवस्थानचे अध्यक्ष काय म्हणाले?
याबाबत देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे म्हणाले की, “भाविकांच्या सोयीसाठी आम्ही कमर्शियल गॅस सिलेंडरचा वापर करून अन्नछत्र चालवतो. मात्र सध्या गॅसचा पुरवठा बंद असल्याने अन्नछत्र सुरू ठेवणे शक्य होत नाही. शासनाने विशेष बाब म्हणून आम्हाला कमर्शियल गॅस उपलब्ध करून दिल्यास आम्ही तात्काळ अन्नछत्र आणि प्रसाद सेवा पुन्हा सुरू करू शकतो.”
भाविकांची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, पुण्यातील भाविक विवेक भांगे यांनी सांगितले की, “आम्ही दरवर्षी अष्टविनायक दर्शनासाठी येतो. बल्लाळेश्वराचा महाप्रसाद घेतल्याशिवाय आमची यात्रा पूर्ण होत नाही. केवळ 30 रुपयांत मिळणारे सात्विक भोजन हा आमच्यासाठी देवाचा आशीर्वाद असतो. मात्र अन्नछत्र बंद असल्याने बाहेर महागड्या हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर गॅसचा पुरवठा करून अन्नछत्र पुन्हा सुरू करावे.”
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पाली येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे. शासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठ्याचा प्रश्न सोडवून अन्नछत्र आणि महाप्रसाद सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविकांकडून जोर धरत आहे.
