• Mon. Nov 25th, 2024

    नाशिककरांवर लोडशेडिंगची टांगती तलवार, शहरातील ‘या’ भागांत वीजपुरवठा अंशत: खंडित; जाणून घ्या…

    नाशिककरांवर लोडशेडिंगची टांगती तलवार, शहरातील ‘या’ भागांत वीजपुरवठा अंशत: खंडित; जाणून घ्या…

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महापारेषणच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे शनिवारी आणि रविवारी मनोरा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांतील वीजपुरवठा अंशत: खंडित राहणार असल्याची माहिती महापारेषणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

    संपूर्ण जिल्ह्यात महापारेषणच्या वतीने दोन दिवस वीजप्रवाह खंडित होणार असल्याचे कळविले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली. मात्र, शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा महापारेषणच्या वतीने शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात त्यांनी ‘अंशत:’ असे म्हटले. अगोदरच्या परिपत्रकात पूर्णवेळ वीजप्रवाह खंडित होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यात दुरुस्ती करण्यात आली असून, ज्या ठिकाणी काम सुरू असेल त्या विभागात इतर ठिकाणाहून वीजपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी वीजप्रवाह खंडित होणार नाही, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    महापारेषणने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे, की अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीसाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यांना वीजपुरवठा करणाऱ्या २२० के.व्ही. बाभळेश्वर-एकलहरे नाशिक दोन्ही वाहिन्या बंद करणे गरजेचे आहे. दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल अथवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

    पर्यायी व्यवस्थेची सज्जता

    वीजपुरवठा बंदकाळातही सुरळीत ठेवण्याकरिता वीजनिर्मिती विभाग एकलहरे व नाशिक नवसारी वीजवाहिनीद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेमध्ये काही आकस्मिक तांत्रिक बिघाड झाल्यास, उपकेंद्रातून अंशत: वीजपुरवठा बंद राहू शकतो.

    – शनिवारी, ९ सप्टेंबर : सकाळी ५ ते रात्री ८
    – रविवारी, १० सप्टेंबर : सकाळी ८ ते सायं. ५

    जिल्ह्यात या ठिकाणी होणार वीज खंडित

    १३२ के. व्ही. ओझर, सिन्नर, रामाचे पिंपळस या उपकेंद्रातून चांदोरी, ठाणगाव, वावी, नांदुरी, नायगाव, सिन्नर, दापूर, सोनांबे, गोपूर, ओझर, जानोरी, त्र्यंबक, गिरणारे, वाडीवऱ्हे, नवदुर्गा, खंबाळे, उमराळे, नानाशी, म्हाळसाकोरे, करंजगाव, खेडगाव, सुकेणे, नैताळे, कोकणगाव, कुंदेवाडी, वणी, सुरगाणा, गोपेगाव, कोशंबे, कोऱ्हाटे, तळेगाव ३३ के. व्ही. वाहिन्यांचा अंशतः वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

    शहरातील या भागात होणार बत्ती गूल

    आडगाव, म्हसरूळ, अंबड, टाकळी, सामनगाव, आयएसपी, शिंदे, भगूर, विजयनगर, सिडको, अंबड, पाथर्डी, गिरणारे, उपनगर, गणेशवाडी, पंपिंग, तपोवन, गंगापूर, सातपूर, आडगाव, विभागीय क्रीडा संकुल, मखमलाबाद, मुंगसरा, म्हसरूळ, मेरी, नाशिकरोड, पंचवटी.

    रुग्णालयांची कसरत

    शनिवारी आणि रविवारी दिवसभरात चौदा तास वीज नसल्याने सर्वांत मोठा फटका रुग्णालयांना बसणार आहे. अनेक रुग्णालयांत जास्तीत जास्त तीन तासांचा विजेचा बॅकअप असल्याने त्यानंतर काय करायचे, असा प्रश्न रुग्णालयांसमोर आहे. अनेक रुग्णालयांनी जनरेटरसाठी धावपळ सुरू केली आहे. बाजारात भाड्याने मिळणारे जनरेटर काही तासांत बुक झाले आहेत. वीज इतक्या दीर्घकाळ जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा मोठा फटका रुग्णालयांना बसणार आहे.
    पुणेकरांनो वीजचोरी कराल तर खबरदार! खावी लागेल जेलची हवा, एकाच दिवसात १३९० वीजचोऱ्या उघड
    सोशल मीडियावर चर्चा रंगली…

    महापारेषणकडून शनिवार व रविवार वीजपुरवठा बंद असण्याबाबत सूचना जाहीर झाल्यानंतर आज दिवसभर ती प्रचंड व्हायरल झाली. अचानकपणे सलग दोन दिवस वीज खंडित करणे योग्य नसल्याचीही टीका होताना दिसली, तर काहींनी ‘मोबाइल चार्ज करा रे’चा सूर आळवला. काहींनी वीज दिवसभर नसल्यामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, याचा पाढा सादर केला. काही मंडळींनी टीव्ही आणि मोबाइलचा वापर या काळात कमी होणार असल्याने सहलीचे नियोजन करण्यावर भर दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed