पुणे शहरात सुमार दर्जाच्या काही लोकांना अजितदादांनी मोठे केले आहे. ते लोक दादांच्या नेतृत्वाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कोणी बोलणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा तसेच पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान आणि शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे बोलत होते. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, संभाजी होळकर, रणजित शिवतारे, वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.
‘आम्ही विकासासाठी एनडीएमध्ये सहभागी झालो आहोत. त्यामुळे अजित दादांनी कोणती चूक केली ? त्यामुळे भावनिक होण्यापेक्षा व्यवहारिक व्हा,’ असा सल्ला देतानाच ‘आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असे सांगून आम्हांला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे थांबवा, अन्यथा आम्ही उत्तर देऊ,’ असा इशारा शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.
स्थापनेपासून पवारांसोबत
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही त्रास देणारी आहे. पक्ष स्थापनेपासून आम्ही पवार घराण्यासोबत आहे. पुन्हा पवार कुटुंबाने एकत्र यावे, अशी अपेक्षा एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.
४२ आमदारांचा पाठिंबा ?
अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र पक्षाकडून सांगण्यात येत नाही. जिल्ह्याच्या मेळाव्यात मात्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ‘अजित पवार यांच्या भूमिकेला समर्थन म्हणून ४२ आमदारांनी पाठींबा दिला आहे,’असे जाहीर करून टाकले. पक्षात दोन महिन्यात तणाव निर्माण झाला होता. साहेबांचे पुतण्या असले तरी अजितदादांनr स्वतःच्या कर्तृत्वाने मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला. त्यामुळे दादांनी वेगळा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम राहणार आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले.