बेकायदा हॉटेलांना ऊत
शहरात हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाइन रोड, भोसरी या भागांत मोठ्या प्रमाणावर ‘रूफ टॉप हॉटेल’ फोफावली आहेत. इमारतीच्या टेरेसवर ही हॉटेस चालवली जातात. शहरातील खवय्ये मोठ्या प्रमाणावर या हॉटेलांमध्ये आस्वाद घेतात. या हॉटेलांमध्ये प्रामुख्याने मद्यपानासह जेवण आणि हुक्क्याचीही सोय असते. त्यामुळे तेथे मोठ्या किचन्सची गरज भासते. मात्र, त्यासाठी आवश्यक परवाने घेतलेले नसतात.
पालिकेला कारवाईचे वावडे
जवळपास सर्वच हॉटेल मालकाकडे बांधकाम परवाना, अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत दाखला’ नसतो. शिवाय त्यांचा करही महापालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही. ही विनापरवाना हॉटेल गेली काही वर्षे बिनदिक्कत सुरू असूनही पालिकेने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. उलट गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत ‘रूफ टॉप हॉटेल’ अधिकृत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
असा सुरू झाला प्रवास…
– काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ‘रूफ टॉप हॉटेल’ची पाहणी केली.
– पैकी ४८ हॉटेलांकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली.
– त्यानंतर हॉटेलनी नोटिशीला उत्तर न दिल्याने अग्निशमन विभागाने बांधकाम परवाना विभागाकडे त्यांची यादी पाठवली. मात्र, विभागाने कारवाई केलीच नाही.
– मध्यंतरी काही ‘रूफ टॉप हॉटेल’च्या मालकांनी महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली.
– ‘आमच्या हॉटेलवर कारवाई करू नका, काही तरी मार्ग काढा,’ अशी विनंतीही त्यांनी केली.
– त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांनी ही हॉटेल कशी अधिकृत करता येतील, याबाबत खलबते सुरू केली.
अधिकृतचा घाट कशासाठी?
शहरात सर्व ‘रूफ टॉप हॉटेल’ अनधिकृत असल्याचे, अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी सांगितले. बांधकाम परवाना विभागाची परवानगी नसतानाही टेरेसवर बांधकाम करून ही हॉटेल चालवली जातात. त्यामुळे हॉटेल मालकांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट होते. महापालिकेचा कर न भरणे, व्यावसायिक परवाना न काढणे, अग्निशमन यंत्रणा न बसविणे, त्यांची ‘एनओसी’ न घेणे आदी चुकीच्या गोष्टी हॉटेल मालकांनी केल्या. तरीही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना अधिकृत करण्यासाठी पायघड्या का टाकल्या जात आहेत, हा मोठा प्रश्न आहे.
शहरातील ‘रूफ टॉप हॉटेल’च्या मालकांनी महापालिकेत भेट घेतली. त्या वेळी ‘रूफ टॉप हॉटेल’ अधिकृत करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार, ‘रूफ टॉप हॉटेल’ अधिकृत करण्यासाठी काय करावे लागेल, कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, नियमांत बसून ही हॉटेल अधिकृत होतील का, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
शहरातील एकही रूफ टॉप हॉटेल अधिकृत नाही. या हॉटेल मालकांनी अनधिकृतपणे ती सुरू केली आहेत. या हॉटेलना अग्निशमन विभागाने नोटीस पाठवली; तसेच त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती बांधकाम परवाना विभागाला केली आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.- विजय थोरात, प्रमुख, अग्निशमन विभाग