बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचा लाभ राज्यातील मान्सूनला चालना मिळण्यासाठी होणार आहे. सोमवारी वर्तवलेल्या पाच दिवसांच्या पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये ८ सप्टेंबरपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात मंगळवार, बुधवार तर, रत्नागिरीमध्ये मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
पुणे, सातारा जिल्ह्यातही पाऊस
नगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून एखाद-दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथेही या आठवड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. लातूर, नांदेड येथे बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही या आठवड्यात पावसाचा जोर वाढलेला असेल. चंद्रपूर येथे मंगळवारी आणि बुधवारी, गडचिरोली येथे मंगळवारी, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे बुधवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल, अशी शक्यता आहे.
‘कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे’
‘बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असल्याने राज्याला त्याचा फायदा होईल,’ असे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. ‘या प्रणालीअंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडेल,’ असा अंदाज त्यांनी वर्तवला. ‘मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल,’ अशी माहिती त्यांनी दिली.