सूत्रांच्या माहितीनुसार, सुधीर मोरे गुरुवारी रात्री आपल्या खासगी अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यांनी यावेळी आपल्यासोबत कोणालाही घेतले नव्हते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दुपारी दोन वाजता सुधीर मोरे यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
सुधीर मोरे यांनी विक्रोळी पार्कसाईट परिसरातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेच्या तिकीटावर ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी एकदाही शिवसेनेचा पराभव होऊन दिला नाही. पालिकेच्या या प्रभागात शेवटपर्यंत त्यांचे वर्चस्व कायम होते.
मुख्यमंत्री एखादा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सुधीर मोरे हे उद्धव ठाकरे गटाबरोबर कायम होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ते जवळचे म्हणून ओळखले जात. शिवसेना नेतृत्त्वाकडून त्यांच्यावर विभाप्रमुख, संपर्कप्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या होत्या. सध्या ते रत्नागिरीचे संपर्कप्रमुख होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम वाढवण्यासाठी त्यांचा अनेकदा रत्नागिरी जिल्ह्यात दौरा होत असे. अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. यापूर्वी झालेल्या दापोली ,मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.