• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईत १७ वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे ५ तुकडे केले; हत्येमागील कारणाचाही झाला उलगडा

    मुंबईत १७ वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे ५ तुकडे केले; हत्येमागील कारणाचाही झाला उलगडा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरच्या वाशीनाका परिसरात एका १७ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी शफी उर्फ शफिक शेख (३३) याला अटक केली असून त्याच्या घरातून मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले आहेत. ईश्वर मारवाडी (१७) असे मृत मुलाचे नाव असून शफी हा त्याच्या मानलेल्या बहिणीचा पती आहे. मानलेली बहीण असूनही ईश्वर पत्नी आणि मेहुणीसोबत लगट करीत असल्याच्या संशयातून शफीने ही हत्या केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

    वाशीनाका येथील म्हाडा वसाहतीमध्ये शफी हा पत्नी आणि मुलांसह वास्तव्यास आहे. शफीच्या सासूने अनाथ असलेल्या ईश्वरचा लहानपणापासून सांभाळ केल्याने तो शफीच्या पत्नीला बहीण मानायचा. रविवारी सकाळी ईश्वर हा शफीसोबत घरातून बाहेर पडला, मात्र घरी परतलाच नाही. त्यामुळे सासू रेश्मा आणि सासरे ललित पुत्रन यांनी शफी याच्याकडे ईश्वरबाबत विचारणा केली. त्यावर मंगळवारी सकाळी ईश्वर कुठे आहे ते सांगतो, असे शफी म्हणाला. त्याच्या वागणुकीमुळे रेश्मा आणि ललित यांना संशय आल्याने त्यांनी शफीच्या हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, बुधवारी पहाटे शफी घर बंद करून पत्नी आणि मुलासह गोवंडी येथे जात असल्याचे त्यांनी पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी पुन्हा विचारणा केली असता शफी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे रेश्मा आणि ललित यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली.

    Sharad Pawar : आधी टीका, नंतर स्पष्टीकरण अन् आता वळसे पाटलांचं भावुक वक्तव्य; शरद पवारांबद्दल म्हणाले…

    आरसीएफ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि शफी याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला उत्तरे टाळणाऱ्या शफीला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीकत कथन केली. ईश्वर याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून घरातच ठेवले असल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आणि पोलिसांसह सर्वांनी शफीचे घर गाठले. घरातील तीन बॅगांमध्ये ईश्वरच्या मृतदेहाचे तुकडे कोंबून ठेवण्यात आले होते. विल्हेवाट लावण्यास सोईचे व्हावे म्हणून तुकडे केल्याचे शफी याने सांगितले. दरम्यान, हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी शफीला अटक केली.

    शफीवर यापूर्वीही गुन्हे

    शफी विरोधात हत्या, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सन २०१३मध्ये हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटकही झाली होती. या गुन्ह्यात आठ वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर आला होता. त्यानंतर चेंबूर परिसरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *