म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांना खोटे फोन करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॅाम्ब ठेवण्यात आला आहे, असा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबई विमानतळावरील विमानांची झाडाझडती घेण्यात आली, मात्र संशयास्पद असे काहीच आढळले नाही. पोलिसांनी तपास केला असता हा फोन सातारा येथील एका दहा वर्षांच्या मुलाने केल्याचे समोर आले.
पोलिसांच्या ११२ क्रमांकावर गुरुवारी एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी याबाबतची माहिती विमानतळ प्राधिकरणाला दिली. यानंतर विमानतळावर असलेल्या सर्वच विमानांची कसून तपासणी करण्यात आली.

मात्र संशयास्पद असे काहीच आढळले नाही. एका बाजूला विमानांची झाडाझडती सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणावरून हा फोन सातारा येथून आल्याचे समजले. पोलिसांनी याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. प्रत्यक्षात फोन करणाऱ्याचा शोध घेतला असता, एका दहा वर्षांच्या मुलाने हा फोन केल्याचे समजले. या मुलाच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा तो दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले. त्याच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. तो मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली. याच मानसिक तणावातून त्याने हा फोन केल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या या कृत्यामुळे सर्व यंत्रणा मात्र कामाला लागली.