‘संशोधन व विकास संस्थे’चा (आर अँड डीई-ई) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याने ॲड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. कुरुलकरच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जामीन देण्यास विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी शुक्रवारी विरोध दर्शवला. ॲड. फरगडे आणि कुरुलकरचे वकील ॲड. गानू यांनी लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले.
‘कुरुलकर याची डीआरडीओच्या समितीकडून चौकशी करण्यात आली आहे. एटीएसने कुरुलकरडून इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा,’ अशी विनंती ॲड. गानू यांनी न्यायालयात केली. एटीएसकडून डॉ. प्रदीप कुरुलकरची १९ ते २४ एप्रिल दरम्यान प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. कुरुलकरला तीन मे रोजी अटक करण्यात आली. त्यामुळे प्राथमिक चौकशीचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यात यावा, असा अर्ज ॲड. गानू यांनी दाखल केला.
जप्त मोबाइल गुजरातच्या प्रयोगशाळेत
‘डॉ. प्रदीप कुरुलकर याने मोबाइलचा नष्ट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कुरुलकरचा मोबाइल गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तांत्रिक तपासासाठी पाठवायचा आहे,’ असे ॲड. फरगडे यांनी युक्तिवादात सांगितले. एटीएसकडून याबाबतचा अर्ज विशेष न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने मोबाइल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यास परवानगी दिली.