मुंबई, दि.२१ : राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून, येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनास १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री श्री. विखे पाटील यांनी राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दुरदृश्य प्रणालीव्दारे आयुक्त हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, सर्व यंत्रणांनी लसीकरण गांभीर्याने करुन घ्यावे. लंपी रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत होत आहे. सद्या पडत असलेल्या पावसामुळे किटकांच्या प्रजोत्पादनासाठी निर्माण झालेले पोषक वातावरणाची शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कीटनाशकांची फवारणी करावी. तसेच सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी.
श्री. विखे पाटील यांनी आवाहन केले आहे की, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना विशेषरुपाने आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.
आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी यांनी
गोवंशीय पशुधन प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबीस मनाई करण्याचा निर्णय घ्यावा. पशुसंवर्धन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात रहावे. २४ तास नियंत्रण असणे गरजेचे आहे. काही भागात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होवू शकते.त्यामुळे चाऱ्याचे नियोजन करावे.
पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री तुकाराम मुंडे म्हणाले, लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. त्यामुळे भीती बाळगू नये. मृत पशुधनाविषयी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. रोजच्या अहवालात चुका होणार नाही याची काळजी घ्यावी. साथीचे इतरही आजार पशुधनास होवू शकतात यावरही उपचार करावेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर आयुक्त किंवा मी स्वतः उपलब्ध असेल. लम्पी आजर निर्मूलनासाठी सबंधित कोणत्याही स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0000000