आपण आपले देव ओळखायला शिकले पाहिजे, असे मत मविप्र समाजाच्या वतीने शनिवारी झालेल्या समाजदिनाच्या कार्यक्रमात भुजबळ यांनी व्यक्त केले होते. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्याकडे भुजबळांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी कुठेही गेलो, तरी माझी भूमिका बदलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी मुलामुलींना शिक्षण प्रवाहात आणले त्यांना पुजले पाहिजे यात कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे भुजबळ म्हणाले. मी कुठेही गेलो तरी फुले-शाहू-आंबेडकरांविषयीची भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
…मग संभाजी नाव का लावले?
संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे स्पष्ट करायला हवे. त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी असेल, तर संभाजी नाव लावण्याची त्यांना आवश्यकता का भासली, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. संभाजी भिडे नाव घेऊन ते बहुजन समाजात जातात आणि सभांमधून काय प्रसार करतात हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे अशा गोष्टींना आमचा विरोध राहणारच, अशी भूमिकाही भुजबळ यांनी मांडली.
‘विश्वजित देशपांडेला अटक करा’
‘राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ,’ अशी घोषणा करणाऱ्या विश्वजित देशपांडे याच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) केली आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबतचे निवेदन दिले. परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी भुजबळांवर हल्ला करण्याचे आवाहन करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गोरख बोडके, गौरव गोवर्धने, योगेश निसाळ, ऋषीकेश पिंगळे, आदित्य गव्हाणे आदी उपस्थित होते.