भंडारा जिल्ह्यात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. अनेक दिवस पाऊस न आल्याने शेतजमिनीला भेगा पडल्या. पिके करपण्याची भीती व्यक्त होत होती. अशातच दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे धानपिकाच्या उर्वरित रोवण्यांना वेग आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासात धो-धो पाऊस बरसला. जिल्ह्यात सर्वाधिक सिंदेवाही तालुक्यात ५९.७, सावली ५७.८, चंद्रपूर तालुक्यात ५४.५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील मुख्य मार्गावर व सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गोंदिया जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारपासून चार दिवस जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आल्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला.
अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, मूंग, उडीद, ज्वारी आदी खरीप पिकांना पावसाने संजीवनी मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील धरणांचा साठा देखील वाढत आहे. जिल्ह्यातील मोर्शी नजीकच्या सिंभोरा धरणात जलसाठा वाढल्याने काही दरवाजे उघडण्यात आले आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
‘गोसे’चे ३३ दरवाजे उघडले
भंडारा : मध्य प्रदेशातील संजय सरोवर परिसरात सातत्याने पाऊस पडत असल्याने शनिवारी संध्याकाळी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. संजय सरोवराचे पाणी भंडारा येथे पोहोचण्यासाठी ३९ तासांचा कालावधी लागतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शनिवारी दुपारी गोसे धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे उघडण्यात आली असून प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील सरांडी बूज गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नाल्यात पडल्याने वृद्ध वाहून गेला
गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे नाल्यात पडल्याने एक वृद्ध वाहून गेला. शालिकराम अधीन प्रजापती (वय ८२) असे त्यांचे नाव आहे. चुरडी स्मशानघाट येथील नाल्यात पूजेची फुले विसर्जन करण्याकरिता सायंकाळी ते गेले होते. त्यांचा तोल गेल्याने नाल्याच्या पाण्यात पडून वाहून गेले. स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. दरम्यान, पावसामुळे तिरोडा तालुक्यातील मंगेझरी-इंदोरा मार्ग बंद झाला आहे.