मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील चार दिवसांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल यासंदर्भात इशारे जारी करण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट म्हणजे आजसाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसह जळगावला यलो अलर्ट देण्यात आला होता.
१९ ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार वगळता सर्व जिल्हे आणि अहमदनगर आणि सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या या विभागांसह पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
२० ऑगस्टला विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. २१ आणि २२ ऑगस्टला देखील कोकणातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनचा ब्रेक संपणार
भारतातील मान्सूनचा ब्रेक पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं संपणार आहे. पुढील आठवड्यात मान्सूनचा पाऊस पुन्हा हिमालयाच्या पायथ्याजवळ सक्रीय होईल. तिथे ऑगस्टच्या अखेरपर्यंत मान्सूनचा पाऊस पडेल. त्या काळात मध्य भारतात पावसाचं प्रमाण कमी असेल, असं हवामान तज्ज्ञ अक्षय देवरस यांनी म्हटलं आहे.