• Mon. Nov 25th, 2024
    कौतुकास्पद! गरिबीत दिवस काढले; ध्येय निश्चित ठरवलं, दिव्यांग तरुणानं MPSC चं मैदान मारलं…

    बारामती: घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल, आई वडील दुसऱ्याच्या शेतात राबतात. त्यातच निसर्गाने केलेल्या अन्यायामुळे दोन्ही पायाने अपंग असे असतानाही कठोर परिश्रम करत बारामती तालुक्यातील होळ-साळोबावस्ती येथील ज्ञानेश्वर पांडुरंग मदने याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपंग प्रवर्गातून राज्यात सहावा येत मंत्रालयातील लिपिक पदाला गवसणी घातली आहे.
    इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी; परदेशात १६ वर्षे नोकरी, गावच्या ओढीमुळे मायदेशी परतला अन्…
    मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हे दोन्ही पायांनी जन्मजात अपंग आहे. त्यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांची लहान बहीण त्यांना सायकल वरून शाळेत ने-आण करत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ज्ञानेश्वर यांचे मित्र आणि परिसरातील समाजसेवकांनी त्यांच्या शिक्षणासाठी बहुमोल सहकार्य केले. या सर्व परिस्थितीची जाण ठेवून त्यांनी तब्बल सहा वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत अखेर हे यश संपादन केले. त्यांनी मिळवलेले हे यश समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी असेच म्हणावे लागेल. ज्ञानेश्वर यांना घरी माऊली या नावाने बोलवतात.

    माऊली हे शाळेत लहानपणापासूनच हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणले जात होते. त्यांचे आई-वडील आजही दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण साळोबावस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण वानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे. त्यांची लहान बहीण मुक्ताई हिने आपला मोठा भाऊ ज्ञानेश्वर याला सायकलच्या करेजवर बसून पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलाची साथ दिली. पुढे कनिष्ठ महाविद्यालयातून त्यांनी अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण बीएससी केमिस्ट्रीचे हे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले. २०२१ मध्ये मंत्रालय लिपिक पदासाठी परीक्षा दिली होती. यात माऊलीने यश संपादन केले.

    रोहित पवारांनी परीक्षा शुल्काविषयी आवाज उठवला, विद्यार्थ्यांनी दर्शवला पाठिंबा

    महाविद्यालयीन शिक्षणासाठी ज्ञानेश्वर यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे यांनी मोलाची साथ दिली. तर सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक गणेश सावंत यांनी त्याच्या पाठीशी उभे राहत मोफत शिक्षणासाठी मदत केली. टंकलेखन परीक्षेसाठी शेतकरी संघटनेचे नेते सतीश काकडे यांनी, परीक्षा शुल्क भरण्यासाठी उद्योजक संतोष कोंढाळकर यांनी तर एमएससीआयटी कोर्ससाठी योगेश सोळस्कर यांनी सहकार्य केले. या यशात आईवडील, लहान बहीण, सोमेश्वर परीसरातील शिक्षण प्रेमी, ग्रामस्थ, शेकडो मित्रांची साथ मोलाची ठरली असल्याचे मत माऊलीने व्यक्त केले. आळंदीचे सामाजिक कार्यकर्ते डी. डी. भोसले आणि विलास काटे यांनी ज्ञानेश्वर यांना सन २०१२-१३ साली नवीन तीन चाकी दुचाकी घेऊन दिली, तीच त्याची जीवनसाथी बनली असून अनेक सुखदुःखाची ती साक्षीदार बनली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed