• Mon. Nov 25th, 2024

    कुलगुरुंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने हिंदी विद्यापीठात खळबळ; आंदोलन अन् आरोपांमुळे निर्णय?

    कुलगुरुंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने हिंदी विद्यापीठात खळबळ; आंदोलन अन् आरोपांमुळे निर्णय?

    म. टा. वृत्तसेवा, वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रा. शुक्ल यांनी कुलाध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा राजीनामा पाठविला. राजीनामा देण्याचे कुठलेही अधिकृत कारण विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण, पाच दिवसांपासून विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि होणाऱ्या आरोपांमुळे कुलगुरूंनी हा राजीनामा दिल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

    राष्ट्रपती यांचा दौरा रद्द झाल्यापासून हिंदी विद्यापीठ कायम चर्चेत आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापक अशा दोघांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली. प्रा. धरवेश कठेरिया यांच्या निलंबनानंतर विद्यार्थ्यांमधील असंतोष वाढला. पाच दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. तर दुसरीकडे निलंबन करण्यात आलेले प्रा. कठेरिया हेदेखील स्वत: गांधी हिलवर प्रार्थना आंदोलन करीत होते. दोन्हीकडून कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती. सोशल मीडियावरील संदेशांमधून विद्यापीठातील अनियमित कारभारावर ठपका ठेवला जात होता. हे सारे घडत असतानाच दोन दिवसांपूर्वी प्रा. शुक्ल यांनी सहकुटुंब पत्रकार परिषद घेऊन दिल्लीतील एका महिलेकडून आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप केला होता. आपली बाजू मांडताना त्यांनी अनेकानेक तथ्यही उघड केले होते. आत्महत्येच्या आरोपावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. तरीही विद्यार्थी आणि प्राध्यापकाचे आंदोलन सुरू होते. हे सारे घडत असतानाच त्यांनी राजीनामा दिला. यासंदर्भात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांनी माहिती दिली आहे. कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी आपला राजीनामा देताना नेमके कुठले कारण दिले याविषयीची माहिती मिळू शकली नाही.

    आता प्रा. कारण्यकरांकडे प्रभार

    कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून प्रा. एल. कारण्यकरा यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
    कोट्यवधींचे कमिशन सिडकोच्या अंगलट! १ दिवसात नगरविकासने मागितला रिपोर्ट, १२८ कोटी कोणाच्या घशात?
    चौकशीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

    हिंदी विद्यापीठात सहा दिवसांपासून विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरू होती. कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांचे आंदोलन कायम होते. विद्यापीठातील नियुक्त्यांची चौकशी व्हावी या मागणीवर विद्यार्थी अडून बसले होते. घोषणाबाजीही सुरूच होती. रात्री ८ वाजताच्या सुमारास नव्याने पदभार सांभाळलेले प्रभारी कुलगुरू प्रा. एल. कारण्यकरा यांनी दोन दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रा. धरवेश कठेरिया यांच्या निलंबनाचा विरोध करण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात झाली होती. दरम्यान, रजनीश आंबेडकर या विद्यार्थ्याने कुलगुरूंचे राजीनामानाट्य केवळ प्रशासकीय भवनात सुरू असलेले आंदोलन मिटविण्यासाठी असल्याची टीका केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *