नवीन शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत इयत्ता तिसरीपर्यंतच्या बालकांना त्या-त्या इयत्तांच्या क्षमता प्राप्त होतील असे उद्दिष्ट सर्व शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिशा हा उपक्रम तयार केला आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानानुसार विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर निश्चित करण्यात आले आहेत. मागीलवर्षी प्रायोगिक तत्त्वापर हा उपक्रम ५९१ शाळांमध्ये राबविण्यात आला आहे.
१५१५ शाळांमध्ये झाली चाचणी
यंदा हे अभियान राबविण्यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५१५ शाळांमध्ये पूर्वचाचणी घेण्यात आली. २ ते ४ ऑगस्टदरम्यान दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत २ ते ५ या वर्गातील ४४.४ टक्के विद्यार्थी भाषा विषयात, २६.६० टक्के विद्यार्थी गणित विषयात आणि ७०.६ टक्के विद्यार्थी इंग्रजीत प्रारंभिक स्तरावर आहेत. या विद्यार्थ्यांना अक्षर आणि अंकओळख नसल्याचे या पूर्वचाचणीत दिसून आले आहे. त्यामुळे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या स्तरानुसार या अभियानात त्यांच्याकडून वेगवेगळ्या कृती करवून घेतल्या जाणार आहेत. त्यांच्या स्तरानुसार प्रशिक्षणाचा कालावधी वेगवेगळा राहणार आहे.
पालकांचे करावे उद्बोधन!
‘शाळांमध्ये घेतलेल्या पूर्वचाचणीचा संपूर्ण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यानंतर, किती विद्यार्थी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात आहेत आणि किती विद्यार्थी तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात आहेत, हे स्पष्ट होईल. केवळ पाठ्यपुस्तक शिकणे म्हणजे अभ्यास अशी शिक्षक आणि पालकांची समजूत आहे. मात्र, पाठ्यपुस्तक हे केवळ साधन आहे. विद्यार्थ्यांना विषय समजणे आणि त्यांच्या अध्ययन कौशल्यांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी अध्ययननिष्पत्तीची उद्दिष्टे गाठली तर त्यांचे शिकणे सोपे होईल आणि त्यांच्या एकंदर प्रगतीतही वाढ होणार आहे. समूह शिक्षण आणि सहाध्यायांच्या सहाय्याने शिक्षण यांचा यामध्ये समावेश आहे’, अशी माहिती नागपूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. हर्षलता बुराडे यांनी दिली. पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाबद्दलचे गैरसमज दूर करून हे अभियान यशस्वीपणे राबवावे. शिक्षकांनी श्रवण, भाषण, वाचन व लेखन या कौशल्यविकासाच्या टप्प्यांबाबत पालकांचे उद्बोधन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविल्यास २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात नागपूर जिल्ह्याची स्थिती सुधारेल,अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.
‘असर’च्या अहवालानुसार…
– पाचवीतील ५५.८ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे मराठी वाचन येत नाही. ६१ टक्के विद्यार्थ्यांना सोपी वजाबाकी येत नाही.
– आठवीतील २४.८ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे मराठी वाचता येत नाही. ६४.८ टक्के विद्यार्थ्यांना येत नाही सोपा भागाकार.
– तिसरीतील केवळ ११ टक्के विद्यार्थी मराठीत आणि गणितात प्रगत आहेत.
– पाचवीतील केवळ ६ टक्के विद्यार्थी मराठीत तर ३ टक्के विद्यार्थी गणितात प्रगत.
– आठवीतील १६ टक्के विद्यार्थी मराठीत पाच टक्के विद्यार्थी गणितात प्रगत.
– राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानुसार दहावीतील शून्य टक्के विद्यार्थी मराठीत तर ३ टक्के विद्यार्थी गणितात प्रगत आहेत.