बदलापूरच्या पनवेल हायवे परिसरातील डोंगराळ भागात घडलेल्या गोळीबारची घटना ही मुळात तेलंगणामध्ये घडली होती. या घटनेत कुख्यात गुन्हेगार सुनील प्रजापतीच्या खांद्यावर गोळी लागली होती. तेलंगणामध्ये घटना घडल्यानंतर सुनील आणि त्याचे साथीदार रेल्वेने कल्याणला आले. त्यांनी सुनीलला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी ही घटना बदलापूरमध्ये घडली असल्याची खोटी माहिती बदलापूर पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी वेगाने घटनेचा तपास सुरु केला. अखेर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत वरक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने केवळ ४८ तासांत घटनेचा बनाव रचणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींकडून ३ पिस्तूल, ६ मॅगझीन, आणि २१ जिवंत काडतुसं असा एकूण एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पाठारे यांनी माहिती दिली.
दरम्यान, बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर शहरात पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यामुळे गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यात घट झालीय. आज परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या शहरातून यावर्षी मोका अंतर्गत १४ गुन्हे दाखल करून ६० आरोपींवर कारवाई करण्यात आली. MPDA कायद्याअंतर्गत ९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलीय. तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या तब्बल ९७ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलंय. त्यातच बदलापूर पूर्व पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना पोलीस प्रशासनाकडून बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलंय.