बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथे राहणारे हे दोघे बहीण भाऊ. सुभाष गडदरे हे सोमेश्वर साखर कारखान्यात स्वीच ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांना किडनीचा त्रास होता. मात्र २०२१ पासून त्रास खूप वाढला. रक्तदाब दोनशेपेक्षा अधिक राहू लागला. आयुर्वेदिक उपचारांनंतरही फरक पडला नाही. त्यांना शेवटी डायलीसिस करावे लागत होते. घरात कर्ती व्यक्ती असल्यामुळे सर्व जबाबदारी सुभाष यांच्यावर होती. सुभाष यांची किडनी बदलण्याचा निर्णय कुटुंबियांकडून घेण्यात आला.
कुटुंबातील पाच मावशांच्या किडनी यावेळी तपासण्यात आल्या. परंतु संबंधित तज्ज्ञांनी नकार दिला. सुभाष यांचे चुलते बापूराव गडदरे, पत्नी संगीता गडदरे व बहीण वैजयंता यांच्या किडनीची तपासणी केली. वैजयंता यांची किडनी त्यांच्याशी मिळती जुळती होती. हे वैजयंता यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने किडनी बदलून टाकू, वेळ घालवायला नको असा हट्ट धरला.
वैजयंता यांना त्यांचे पती दादासाहेब, मुले व सासू-सासरे यांचाही भक्कम पाठिंबा मिळाला. सुभाष यांनी दीड वर्ष किडनीचा आजार अंगावर काढला होता. मात्र बहिणीच्या तयारीमुळे त्यांनाही आत्मविश्वास वाटला. पुण्यातील खासगी रूग्णालयात डॉ. सूर्यभान भालेराव व डॉ. तरूण जलोका यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
यावेळी सुभाष गडदरे म्हणाले की, माझ्या लहान बहिणीने मोठे मन दाखविले. आपली किडनी भावाला देण्यासाठी योग्य आहे, हे समजल्यावर तिने कुठलाही विचार न करता स्वतःची किडनी मला दिली. मला खऱ्या अर्थाने तिचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. तपासणी करून आलो आणि किडनी उत्तम कार्य करत आहे, असेही त्यांनी सांगितले.