सध्या ‘इंडिगो’च्या अहमदाबादच्या दोन फ्लाइट्स व नागपूर, गोवा, हैदराबाद, इंदूर या शहरांसाठी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. जानेवारी महिन्यात विमानतळावरून केवळ नवी दिल्ली व हैदराबाद अशा दोन शहरांसाठीच सेवा सुरू होती. तरी या महिन्यात १३,६२६ प्रवाशांनी ये-जा केली. फेब्रुवारीमध्येही या दोन शहरांसाठी १२,२७३ जणांनी ये-जा केली. ‘इंडिगो’ने १५ मार्चपासून सेवा सुरू केली. या महिन्यात १४,०२४ प्रवाशांची ये-जा झाली. एप्रिलमध्ये नवी दिल्लीसह अहमदाबाद, नागपूर, गोव्यासह बेंगळुरू येथील एक फ्लाइटचे नाशिक विमानतळावरून आगमन व प्रस्थान झाले. या महिन्यात १५,३११ जणांनी विमानप्रवास केला. मे महिन्यात १४,२१८, तर जून महिन्यात २०,५९९ जणांनी नाशिक येथून विमानाने ये-जा केली. नाशिक येथून विमानसेवेसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड अनेकदा केली जाते. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील या आकडेवारीने या आक्षेपाला सडेतोड उत्तर मिळाले आहे.
जून महिन्यात विक्रम
उन्हाळी सुट्ट्या संपत आल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी होते. मात्र, जून महिन्यात नाशिक येथून २०,५९९ जणांनी विमानप्रवास केला. तर ८ जून या एकाच दिवसात विक्रमी १,०११ जणांनी नाशिक विमानतळावरून ये-जा केली. नाशिकच्या दररोजच्या सरासरी प्रवाशांच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. शाळा सुरू होण्याचा दिवस तोंडावर आल्याने लोकांनी घरी परतण्यासाठी विमानसेवेला प्राधान्य दिल्याचे यावरून स्पष्ट होते.
नाशिकमधून विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून, आता कंपन्यांनाही याची जाणीव होत आहे. नाशिकमध्ये कार्गो सेवेलाही मोठा वाव आहे. त्यामुळे येथे कार्गो हब साकारण्याची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- मनीष रावल, प्रमुख, निमा व आयमा एव्हिएशन कमिटी
विमान प्रवासी असे…
जानेवारी : १३,६२६
फेब्रुवारी : १२,२७३
मार्च : १४,०२४
एप्रिल : १५,३११
मे : १४,२१८
जून : २०५९९
एकूण : ९०,०५१