तालुक्यातील तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलेला प्राण गमवावा लागला आहे.या गावाला रस्ता नसल्याने संबंधित गरोदर महिला आपल्या नातेवाईकांसह पहाटे अडीच वाजता सुमारे अडीच किलो मिटर पायी चालत दवाखान्यापर्यंत पोहोचली. मात्र पायपीट, प्रसूतीवेदना, पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे त्या महिलेने दवाखान्यातच प्राण सोडले. दुर्दैवाची बाब म्हणजे तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी देखील झोळी करून तिला आज दुपारी नेण्यात आल्याची माहिती काही नागरिकांकडून मिळाली आहे.
तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना जवळपास अडीच किलो मीटर कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत ( वय २३ ) या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. अखेर दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
ज्या तालुक्यातून राज्यातील मोठ्या महामार्गांपैकी एक असलेला समृद्धी महामार्ग गेला आहे. त्या तालुक्यातच लहान मोठ्या वस्तीवर रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेला आपला जीव गमावा लागला आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
महाराष्ट्रात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनात आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधीचा मुद्दा चर्चेत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये पायाभूत सुविधांच्या अभावी एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. यामहिलेसह तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा देखील मृत्यू झाला.