• Fri. Mar 13th, 2026

    Sayali Surve: पुण्यातील ‘मिस इंडिया अर्थ’ स्पर्धेतील सायली सुर्वेची घरवापसी; पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, प्रेमविवाहानंतर सांगितली आपबिती

    Sayali Surve: पुण्यातील ‘मिस इंडिया अर्थ’ स्पर्धेतील सायली सुर्वेची घरवापसी; पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, प्रेमविवाहानंतर सांगितली आपबिती

    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: २०१९ च्या मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली पिंपरी- चिंचवडमधील सायली सुर्वे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सायली सुर्वे हिचे शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत होम- हवन, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी पार पाडत ही शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

    सायली सुर्वेने २०१९ मध्ये मीरा भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे यांच्यासोबत घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर सायलीचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर आपला सतत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, तसेच आपले धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला आहे.

    या संदर्भात आपण अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र आपल्या तक्रारींवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे सायलीने सांगितले. सततच्या छळामुळे आपण खूप त्रस्त झालो होतो. अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या माध्यमातूनच आपले शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आल्याचे सायलीने सांगितले. पिंपरी चिंचवडमधील सायलीला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी धार्मिक विधींसह शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये होम-हवन, मंत्रोच्चार आणि इतर धार्मिक विधी करण्यात आले.

    यावेळी बोलताना सायली सुर्वे म्हणाली की, “मला जातीवाद करायचा नाही, मात्र फरक नक्कीच आहे. आपल्या लोकांनी आपल्या पाठीशी उभे राहणे खूप महत्त्वाचे असते. माझ्यासारख्या परिस्थितीत अडकलेल्या मुलींनी हार मानू नये. मी जवळपास दहा वर्षे अन्याय सहन केला, कारण माझी चार मुले आहेत. आई म्हणून मुलांचा विचार करून मी इतकी वर्षे संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळावे, हा विचार माझ्या मनात होता.”

    ती पुढे म्हणाली की, “मात्र एक वेळ अशी आली की माझी सहनशक्ती संपली. एक माणूस म्हणून माझे धैर्य आणि संयम संपला होता. त्यामुळे शेवटी मला हा निर्णय घ्यावा लागला. लहानपणापासून आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि आपल्या धर्मावरचा विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. देवावर श्रद्धा ठेवावी आणि संकटाच्या वेळी योग्य निर्णय घ्यावा.”

    दरम्यान, सायली सुर्वेच्या शुद्धीकरणाच्या या घटनेमुळे धर्मांतर, प्रेमविवाह आणि वैवाहिक वाद या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाकडे सामाजिक आणि राजकीय वर्तुळातूनही लक्ष वेधले जात असून पुढे या प्रकरणात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed