• Wed. Mar 11th, 2026
    Acid Attack: गॅरेजमध्ये काम सुरु असताना तरुणांवर अ‍ॅसिड हल्ला; मेकॅनिकसह ग्राहक जखमी, काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar Acid Attack: गॅरेजचा मेकॅनिक आणि ग्राहक यांच्यावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकल्यानंतर या दोघांनाही तीव्र दाह होऊ लागला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

    छत्रपती संभाजीनगर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: जवाहर कॉलनी परिसरात विष्णूनगर भागात एका गॅरेजमध्ये दुचाकीचे टायर बदलण्यासाठी आलेल्या युवकासह मेकॅनिक याच्यावर ॲसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ग्राहक आणि मेकॅनिक हे दोघेही जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. या ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मेकॅनिकचे नाव सिराज नजीर शेख (वय २६, रा. भारतनगर, गारखेडा) आणि वैभव अनिलराव पुजदेकर (वय २५, रा. शेंद्रा) असे आहे.

    सिराज शेख हे भागीदारीत गॅरेज चालवतात. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते गॅरेजवर आले होते. दरम्यान, वैभव पुजदेकर हे त्यांच्या दुचाकीचे टायर बदलण्यासाठी गॅरेजमध्ये आले होते. सिराज टायर बदलत असताना वैभव त्यांच्या उजव्या बाजूला बसलेले होते. या वेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने ॲसिड फेकले.

    बापाच्या कष्टाचं चीज झालं, UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका! लासूरच्या प्रज्वलची कहाणी

    या हल्ल्यात सिराज यांच्या कपाळावर, गालावर, खांद्यावर, पाठीवर व डाव्या पायावर ॲसिड पडले, तर वैभव यांच्या गालावर व हातावर ॲसिड उडाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सिराज शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहर कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पुढील तपास सुरू आहे.

    काय झालं हेच समजले नाही
    ॲसिडमुळे धूर निघू लागल्याने काही काळ परिसरात शॉर्टसर्किट झाल्याचा समज झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. नेमके काय झाले, हे समजलेच नाही. या हल्ल्यानंतर अंगाला तीव्र जळजळ होत असल्याने त्यांनी शेजारील मिठाईच्या दुकानात धाव घेतली. तेथील नळ सुरू करून त्यांनी अंगावर पाणी घेतले आणि काही वेळ तेथेच बसून राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा