सीताबर्डी ते हिंगणा या मार्गावरील शहर बसमध्ये १८ जुलै रोजी सकाळी ही घटना घडली. ‘छातीत दुखत आहे’, असे म्हणत एक ५५ वर्षीय प्रवासी बसमध्येच खाली कोसळल्याने अन्य प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या व्यक्तीला पाणी देण्याच्या उद्देशाने काही प्रवासी पुढे आले. मात्र, तितक्यात गुलाबी रंगाच्या गणवेशातील विद्यार्थिनी पुढे आल्या आणि त्यांनी मोठ्याने ओरडून पाणी न देण्यास सांगितले. आम्ही सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचे सांगून त्यांनी त्या व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार सुरू केले. त्यानंतर सुमारे १० ते १५ मिनिटे या व्यक्तीला सीपीआर दिला.
थेट गाठले मेघे रुग्णालय
या विद्यार्थिनींच्या प्रयत्नामुळे ती व्यक्ती शुद्धीवर आली. या विद्यार्थिनींनी चालकाला तातडीने जवळच्या शालिनीताई मेघे रुग्णालयाकडे बस वळविण्यास सांगितली. चालक आणि वाहकांनी या विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकत बस थेट रुग्णालयात नेली आणि रुग्णाला तेथे दाखल केले. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करून त्यांना घटनेची माहितीही दिली. वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने आणि उपचार मिळाल्याने त्या सहप्रवाशाचे प्राण वाचविण्यात यश आले.
त्या प्रवाशाला मदत करणाऱ्यांमध्ये नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी भारती तिरबुडे, दिव्या फुंडे आणि सिमरन यादव यांचा समावेश आहे. बसच्या वाहक रीना टोंगळे यांनी या विद्यार्थिनींच्या या उदात्त कामाबद्दल कॉलेजला कळविले. कॉलेजचे व्यवस्थापन आणि प्राचार्या डॉ. रुपा वर्मा यांनी या विद्यार्थिनींच्या तत्परतेबद्दल अभिमान व्यक्त केला.