मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने लोक वर्गणीतून उभारण्यात येत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान १६ जून रोजी बेडग ग्रामपंचायतीच्या वतीने पाडण्यात आली. बेडग गावचे सरपंच उमेश पाटील यांनी ही कमान पाडल्याचा आरोप गावातील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आला होता. याबाबत संबंधितांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी घेऊन गेल्या महिन्यात आंदोलन करण्यात आलं होतं.मात्र, याकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला होता. स्वागत कमान बांधकाम पाडकाम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी बेडगमधील १५० कुटुंबांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता.
एक महिना उलटूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडणाऱ्या विरोधात कारवाई होत नसेल,तर अशा गावात राहायचे कशाला ? या भावनेतून न्याय हक्कांच्या मागणीसाठी थेट मुंबईच्या मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार करण्यात आला होता.१८ जुलै रोजी बेडग गावातील दलित समाजाने आपल्या घराला कुलूप लावून मुला-बाळांसह मुंबईच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला. ऊन,वारा व पाऊस कशाचीही तमा न बाळगता,पायी प्रवास करून इस्लामपूर या ठिकाणी आता लॉंग मार्च पोहोचला आहे.
या लॉंग मार्च बाबत पावसाळी अधिवेशनात विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षन नाना पटोले, आमदार बळवंत वानखेडे आणि विधान परिषदेमध्ये आमदार कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत, लॉंग मार्च करणाऱ्या बेडगमधील बांधवांशी संपर्क साधत,चर्चा करण्यासाठी मुंबईकडे पाचारण केले.
शुक्रवारी याबाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये पार पडली,यावेळी लॉंग मार्चचे नेतृत्व करणारे डॉ. महेश कुमार कांबळे आणि शिष्टमंडळ त्याचबरोबर जनसुराज्य पक्षाचे आमदार विनायक कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम, सांगलीचे भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत समाजाच्या भावना जाणून घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.आंबेडकर यांची कमान पाडणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शासनाच्या खर्चामधून बेडग गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान उभारण्यात येईल, असं आश्वासन दिल्याची माहिती नेतृत्व करणारे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिली आहे. जोपर्यंत संबंधितांवर एफआयआर दाखल होत नाही,तोपर्यंत आपला लॉंग मार्च मंत्रालयाच्या दिशेने सुरुचं राहील,अशी भूमिका महेशकुमार कांबळे यांनी स्पष्ट केली आहे.