गेल्या दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे रावेर तालुक्यातील वाघोदा यासह इतर गावांमध्ये मोठे नुकसान झाले होते. एकीकडे घरात पुराचे पाणी शिरल्याने तर दुसरीकडे शेतात पिकांचे सुद्धा पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते.
पादचारी पूल वाहून गेले
याच दरम्यान रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक गावात नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाल्यावर बांधण्यात आलेले पक्के पादचारी पूल चक्क वाहून गेले आहेत. दसणूर रस्ता, चीनावाल पटेलपुरी रोड आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असे रहदारीच्या रस्त्यावर तिन्ही पूल पाण्यामुळे खचून जावून कोसळले आहेत.
तिन्ही पूल कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर, विद्यार्थ्यांच्या शाळेचा रस्ता तर दुसरीकडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्त्यातील म्हणजेच गावातील नागरिकांच्या रहदारीचे असलेले हे पूल वाहून गेल्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे
तर दुसरीकडे, नाल्याला पाणी असल्यामुळे पूल कोसळलेल्या संबंधित मार्गावरून वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाने लवकरात लवकर या पुलांची दुरुस्ती करून ते पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून तसेच ग्रामपंचायतिकडून करण्यात आली आहे.