• Sat. Sep 21st, 2024

नागपूरच्या पुरवठा निरीक्षकासह दोघांना ACBचा दणका; शेतकऱ्याकडून लाच घेताना पकडले रंगेहाथ

नागपूरच्या पुरवठा निरीक्षकासह दोघांना ACBचा दणका; शेतकऱ्याकडून लाच घेताना पकडले रंगेहाथ

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शेतजमीन अकृषक (एनए) असल्याच्या आदेशाची प्रत देण्यासाठी लाच घेणाऱ्या पुरवठा निरीक्षक व कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी रंगेहाथ अटक केली. दुपारी २ वाजताच्या सुमारास एसीबीने रामटेक तहसील कार्यालयात ही कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुरवठा निरीक्षक आतिष सुभाष जाधव (३१, रा. नागपूर) व महसूल साहाय्यक तसेच कनिष्ठ लिपिक अनिल मधुकर उंदिरवाडे (४१, रा. रामटेक) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.५५वर्षीय शेतकऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

काय घडलं?

रामटेक तालुक्यातील खुमारी येथील शेतकऱ्याकडे तीन एकर शेती आहे. त्याने ही शेती अकृषक करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर केला. तहसीलदारांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत शेतजमीन अकृषक केली. मात्र, दोघांनी शेतकऱ्याला याबाबत न सांगता आदेश काढून त्याची प्रत देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. २५ हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे ठरले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली. अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण लाकडे, हेडकॉन्स्टेबल विकास सायरे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, करुणा सहारे, राजू जांभूळकर यांनी गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला. शेतकऱ्याने अनिल यांच्याशी संपर्क साधला.
शिक्षकी पेशाला काळीमा; हॉल तिकिटाच्या बदल्यात प्राचार्याची वेगळीच डिमांड, भंडाऱ्यातील घटनेनं खळबळ
अनिल यांनी आतिष यांना पैसे घेण्यास पाठविले. आतिष यांनी पैसे घेताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यानंतर अनिल यांनाही अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध रामटेक पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed