हायब्रीड ॲन्यूटी अंतर्गत बीड बायपासचे काम २९२ कोटी रुपये खर्चून होत आहे. तीन उड्डाणपूल तयार झाले. झाल्टा फाटा ते महानुभाव चौक दरम्यान बहुतांश रस्ता काँक्रिटचा झाला आहे. सद्यस्थितीतील जलवाहिनीचे काम करण्यासाठी काही ठिकाणी पालिकेने वेळ मागितल्याने त्याठिकाणचे सेवारस्ता मजबुतीकरणाचे काम बाकी आहे. उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहे. असे असताना आता नवीन जलवाहिनीला रस्त्याखालून शहराकडे आणण्यासाठीच्या नियोजनाचा मुद्दा समोर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौक दरम्यान आठ ठिकाणांहून दक्षिण – उत्तर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यापैकी देवळाई चौकातील उड्डाणपुलाखालचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे याठिकाणाहून वाहिनी टाकण्यात आली, पण उर्वरित सात नियोजित ठिकाणांहून जलवाहिनी रस्ता खोदून टाकायची की अन्य सुविधा करायची असा प्रश्न आता यंत्रणांना पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत हा रस्ता बांधला जात आहे. हा विभाग, महापालिका, एमजेपी व संबंधित यंत्रणांमध्ये याबाबत विचारविनिमय सुरू आहे. तयार झालेला रस्ता पुन्हा खोदला की त्याच्या मजबुतीकरणावर परिणाम होणार आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून सातारा, देवळाई व लगतच्या शेकडो शहरवासीयांनी त्रास सोसला आहे. आता पुन्हा या कामासाठी रस्ता बंद करणे, पर्यायी रस्ते देणे असा निर्णय झाला तर ऐन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणांसमोर आव्हान असणार आहे. रस्ता न खोदता नियोजित ठिकाणाहून आडवे बोअर पाडले तर रस्ताही सुरक्षित राहील आणि कामाची कुठली अडचण येणार नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. नवीन जलवाहिनीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे केले जात आहे. जागतिक बँक प्रकल्प, महापालिका, एमजेपी एकत्रितपणे यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
बीड बायपासवर जलवाहिनी टाकताना रस्ता ओलांडावा लागणार आहे. त्यामुळे दोन-तीन ठिकाणी रस्ता खोदावा लागेल, अन्य ठिकाणी भूमिगत पद्धतीने जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाईल. रस्ता पूर्ववत करून देण्यासाठीची आर्थिक तरतूद पाणी पुरवठा योजनेच्या कामात आहे. त्यामुळे रस्ता खोदल्यानंतर पुन्हा तो जैसे थे करुन दिला जाईल.-आर. एस. लोलापोड, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
रस्ता न खोदता आडवे बोअर मारुन जर जलवाहिनी टाकली गेली, तर रस्ता खोदण्याची गरज भासणार नाही. अडचणी येणार नाहीत.-शैलेश सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, जागतिक बँक प्रकल्प विभाग, पीडब्लूडी