एकनाथ शिंदे यांनी ऑन फिल्ड राहून केलेल्या या कामामुळे अनेकांना ३० वर्षांपूर्वी शरद पवार यांनी किल्लारी भूकंपाच्यावेळी दाखवलेल्या तत्परतेची आठवण झाली. किल्लारी भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार किल्लारी येथे पोहोचले होते. यानंतर शरद पवार यांनी किल्लारीत ठाण मांडून संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले होते. शरद पवार यांच्या या कामाच्या झपाट्यामुळे किल्लारीतील भूकंपग्रस्त गावांचे पुनर्वसन वेगाने झाले होते.
आज इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी राहून ज्याप्रकारे सूत्रे हाताळली, त्यावरून अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एरवी पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इर्शाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले. मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो, असे नेहमी मुख्यमंत्री भाषणांमधून सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो..आपत्ती येवो..वैद्यकीय मदत असो सामान्यांच्या मदतीसाठी सदैव ‘ऑन फिल्ड’ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली. मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून घटनास्थळाकडे निघाले. ते साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले. तेव्हापासून त्यांनी अथकपणे मदत आणि बचाव कार्यासाठी निर्देश दिले.
प्रतिकुल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती हे पाहून सकाळी साडेसात पासून ‘ऑनफिल्ड’ असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे नागरिकांना बाहेर काढले पाहिजे, असे ते सोबतच्या मंत्र्यांना देखील सांगत होते. इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सूचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इर्शालगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले.
मुख्यमंत्र्यांच्या या धाडसामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी आणखी वेग घेतला. प्रतिकुल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते. केंद्रीय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसारीतल सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय काय करता येईल ते पहात होते. मदत कार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एकीकडे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होतांना मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील पिडितांचे अश्रु पुसण्याचे काम केले, त्यांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाला पिडितांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था, निवासाची सोय, भोजन याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.