चंद्रपूर शहरात मंगळवारी झालेल्या पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडली होती . अवघ्या चार तासात २४० मिली मीटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते तसेच काही रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले होते. पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरले. जिल्हातील इतर भागातही पावसाने कहर केला. लहान-मोठे नाले दुथडी भरून वाहत होते.
काही पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पुराचा फटका एका गर्भावती महिलेला बसला. मात्र, गावकरी मदतीला धावून आल्याने ती सुखरूप रुग्णालयात पोहचली. चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथील शुभांगी राहुल लोनबोले या गर्भवती महिलेला धो-धो पावसात प्रसूती कळा सुरु झाल्या त्यामुळे तिला रुग्णालयात नेणे गरजेचे होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरु असताना कुटुंबीय महिलेला रिक्षात घेऊन चंद्रपूरकडे निघाले.
मात्र, मसाळा व सिनाळा मार्गांवरील नाल्याला पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलावरून जाणे शक्य नव्हते. मात्र, काही गावकरी देवदूत बनून महिलेच्या मदतीला धावून आले. ग्रा.पं सदस्य विनोद मुनघाटे यांनी सिनाळा गावचे माजी सरपंच बंडू रायपुरे यांना याबद्दल फोनवरुन माहिती दिली. रायपुरे आणि त्यांचे सहकारी रुग्णावाहिकेसह घटनास्थळी पोहोचले.रुग्णावाहीक पुलाचा दुसऱ्या बाजूने होती.रुग्णावाहीकेतील स्ट्रेचर सोबत घेऊन त्यांनी पूर ओलांडला. त्याच स्ट्रेचरच्या मदतीने गर्भवती महिलेला रुग्णावाहिकेपर्यंत आणले. रुग्णावाहिका वेळेवर रुग्णालयात पोहचल्याने महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात यश आले. सध्या आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.