अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट फोडला होता. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तगडी खातीही मिळाली होती. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का ठरला होता. साहजिकच यामुळे अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, या सगळ्या शंका-कुशंका बाजूला सारत ठाकरे पितापुत्रांनी घेतलेली अजित पवार यांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. अलीकडेच अजित पवार यांनी त्यांच्या गटाचे मंत्री आणि आमदार यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यासाठी अजित पवार गट दोनवेळा नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेला होता. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संवादाचे दरवाजे अजूनही उघडे असल्याचा निष्कर्ष काढला जात होता. या भेटीगाठी नेमक्या कशासाठी होत्या, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, भाजपसोबत सत्तेत बसल्यानंतरही आता ठाकरे पितापुत्रांनीही अजित पवार यांची भेट का घेतली असावी, याविषयी राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजचा दिवसही बोगस बियाणे आणि खतांच्या भाववाढीवरुन वादळी ठरला. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. खतांच्या वाढेलल्या किमतीच्या अनुषंगाने आमदार विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. बाळासाहेब थोरात यांनीही त्यांना चांगली साथ दिली. काँग्रेसच्या या दोन अनुभवी नेत्यांच्या माऱ्याला तोंड देताना नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.