ठाण्यातील मुंब्र्यातील एमएम व्हॅली येथे असलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक १३ मध्ये शाळेतील मुलांसह शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या ठाणे महानगर पालिकेच्या १३ क्रमांक शाळेचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, फलकांची दुरावस्था, स्कूलवरचे शेड, पंखे, एवढेच नाही तर वर्गातील वीजेचा बोर्ड देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच या शाळेत पिण्यासाठी व्यवस्था नाही, शिक्षकांची कमी, अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. या शाळेत ९ वी व १० वी मध्ये सुमारे १२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे याठिकाणी विद्यार्थ्यांसोबत एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मुख्यतः महानगर पालिकांच्या शाळांमध्ये सर्वसामान्य किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या पालकांची मूल शिक्षण घेतात. मात्र गरिबांचा कोणी वाली नाही अशी परिस्थिती या शाळेच्या माध्यमातून समोर आली आहे. या उर्दू शाळेत १२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कमीतकमी २५ ते ३० शिक्षकांची गरज आहे मात्र या शाळेत फक्त ११ शिक्षक शिकवतात. या शिक्षकांवर भार पडत असल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी पालकांना इयत्ता ९ वी च्या मुलांना इतर शाळांमध्ये प्रवेश द्यावा असा सल्ला दिला असल्याची माहिती देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
या प्रकारणी पालकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाब विचारला असता, शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे की, आम्ही या बाबत प्रशासनाला सांगितले असून अनेक तक्रारी केल्या आहेत, महापालिका शिक्षण विभागाकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र त्यावर सुनावणी होत नसल्याचे सांगण्यात आले. आम्ही या शाळेतून कुठल्याही विद्यार्थ्याला काढणार नसून जर मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर जाऊ शकतात, असे शिक्षक आणि शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
या शाळेच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. आता या क्षणी दुसऱ्या शाळेत प्रवेश कसा घ्यायचा, या शाळांची फी या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला परवडणारी आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात असल्याने पालकांसमोर चिंतेचं वातावरण पसरलं असून पालक संभ्रमात पडलेलं पाहायला मिळत आहे.