राज ठाकरे यांनी चिपळूण येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळातील राजकारणात मनसेला असलेला स्पेस आणि त्यादृष्टीने तयारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. राज्यात सध्या होत असलेलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडत नसल्याचं सांगत आपणालाही असं राजकारण मान्य नाही, असं राज यांनी सांगितलं. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सरकारचं कौतुक करणाऱ्या राज यांनी आज पहिल्यांदाच फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवर शरसंधान साधलं.
राज म्हणाले, काल एक मुलाखत पाहत होतो. तेव्हा ते (देवेंद्र) बोलले मी राजकारणी आहे. राजकारणी म्हणून काही तडजोडी कराव्या लागतात. मात्र काँग्रेसशी कधीही तडजोड करणार नाही कारण काँग्रेस वेगळ्या विचारांचा पक्ष आहे. फडणवीस जर काँग्रेसला वेगळ्या विचारांचा पक्ष म्हणत असतील तर मग राष्ट्रवादी कोणत्या विचारांचा आहे? अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांची नक्कल राज यांनी केली.
राजकारण्यांनी कोकणाला ओरबाडून संपत्ती गोळा केली. प्रकल्पांच्या नावाखाली पैसे खाल्ले. प्रकल्पाची जागा नाणार येथे होती मग बारसूला कशी गेली? असा सवाल करताना माझ्या पक्षात कोकणाला ओरबाडून खाणारा आणि त्यावर संपत्ती जमवणारा माणूस मला नको, असं थेटपणे राज ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. आज सोळा वर्षे काम चालू आहे. पण या रखडलेल्या महामार्गाबद्दल निवडून दिलेला एकही खासदार तोंड उघडतो आहे का बघा, अशी बोचरी टीका केली.
सीडी देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला अर्थमंत्रिपदच मिळालं नाही व असा व्यक्तीही पुन्हा लाभला नाही, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव करत दिल्लीतही आवाज उठवणारा, असा आपल्याला खासदार हवा, असं मत व्यक्त केलं. आपल्याला संघटनात्मक पातळीवर काम करायचं आहे. माझ्याकडे याबाबत कोणाच्या काही तक्रार येता कामा नये. जर आल्या तर खबरदार.. मग मला कारवाई करावी लागेल, असा सज्जड दमच त्यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीत दिला.