शिंदे गटातील आमदारांच्या नशिबी वेटिंगच
तातडीने मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पावसाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. आधी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नंतर खातेवाटपाचे पाहू, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती. मात्र, अजित पवार यांची दिल्लीवारी तसेच फडणवीस अजितदादा यांच्या बैठकानंतर मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवशेनानंतर करण्यास एकनाथ शिंदेंनी होकार दर्शवल्याची माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या चार ते पाच साथीदारांनाच मंत्रिपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील उर्वरित आमदारांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
दादांची अमित शाह यांची बैठका, खातेवाटपाचा तिढा निकाली!
अजितदादा गटाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खातेवाटपाविषयी चर्चा सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील दोन बैठकांनंतरही खातेवाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत भापचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले. या भेटीत खातेवाटपावर तोडगा निघाल्याची माहिती आहे. अजित पवार यांचा गट अर्थ, महसूल आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी आग्रही आहे. त्यांनी या तीन खात्यांवर दावा सांगितलेला होता. नंतर दादांनी उत्पादन शुल्क खात्याचीही मागणी केल्याची माहिती कळतीये.